Latest Entries »

कौतुक शिरोडकर | 17 May, 2009 – 17:31

ताटात भात, तो श्यामभात, पाहता नजर थरथरते
ओतून दाळ, विसरून गाळ, ही लाट कशाला बघते
या सप्तचवीच्या भाजीवरुनि दाद मागते बाई –
दादा तू आवरी, वहीनी, दादा तू आवरी !

कोरड्या कोरड्या रोटीची, वेगळी कृती बघताना
चित्र चित्र त्यांच्यामधूनी, आकळणारे फुलताना
हा करपटलेला, गंध चुलीचा, नाकास बिलगून जाई
ह्या वातड कडा, गुज दातांचे, कानी सांगून जाई
या सप्तचवीच्या भाजीवरुनि दाद मागते बाई –
दादा तू आवरी, वहीनी, दादा तू आवरी !

आज इथे या तुझ्या घरी, खिर गोडाची आठवतो
चव काढावी जाताना, असे काही नाही, पळतो
रस पाचकी ठरे, निष्फळ यावरी, पोट करीते घाई
हे जेवण सारे, कसे पचावे, दादा समजून घेई
या सप्तचवीच्या भाजीवरुनि दाद मागते बाई –
दादा तू आवरी, वहीनी, दादा तू आवरी !

(माबोकरांनो, स्वप्नील बांदोडकर आणि या गाण्याच्या सगळ्या संबधित व्यक्तींची मी नेहमीप्रमाणे माफी मागून हे पोस्टवतोय.)

कौतुक शिरोडकर | 19 September, 2008 – 16:10

उलटे तरून गेले
सुलटे हरून गेले
जपले गाव मी…पण
घरचे घरून गेले
मरणात गुंतलो अन
जगणे सरून गेले
अवघे पुरात चेले
नेते वरून गेले
पुतळा उभारला….पण
नाव विसरून गेले
श्रद्धांजली सग्यांची
शव गुदमरून गेले
ते दोन शब्द त्यांचे
दंगल करून गेले
हसणे तुझे मला ते…
जखमी करून गेले
जगणे उपेक्षितांचे
डोळे भरून गेले
कळले कसे जगावे
मरणे मरून गेले
थाळीत आंधळ्यांच्या
(पंक्तीत अंध सारे)
थोटे चरून गेले

कौतुक शिरोडकर | 29 September, 2008 – 14:10

असं होतं का तुमच्या बाबतीत ?

म्हंजे कसं माहीताय…सकाळी उठल्यावर स्वतःची तयारी, मुलाची तयारी, किचनमधून येणारे विनंतीवजा हुकूम, मध्येच वाजणारा मोबाईल, टाकीत पाणी चढवण्याचा कार्यक्रम, लोडशेडींगची अवचित येणारी हाक, मुलाला शाळेत पोहोचवणे वगैरे ..वगैरे यातून रस्त्यावरील नाना अडचणींना तोंड देत, पार्कींगमध्ये गाडी ढकलून वेळेवर आलेली गाडी गाठायची. दम लागला…

डब्यात पोहोचल्यावर जाणवतं, आपण नेहमीप्रमाणे पोहोचलो असून मोक्याच्या सगळ्या जागा कुणी ना कुणी आधीच काबिज केलेल्या आहेत. काही ओळखीचे चेहरे दिसले की जरा हायसं वाटतं. मग पॅसेजच्या मध्ये एखादा किंवा दोन्ही हात शरण आल्याप्रमाणे वर हवेत धरायचे व अंदाजे जे हाती येईल ते धरायचे. आधारासाठी…..हे स्वतःच्या समाधानासाठी…आपल्याला उगाच वाटत राहतं की आपणास कशाचा तरी आधार आहे…

गाडी स्टेशन सोडते व थोड्याच वेळात प्रत्येक स्टेशननंतर आपण एका तुडूंब भरलेल्या डब्यातले एक असतो. दोन हात वर्…शरीर आठही बाजुने एखाद्या रवीसारखे घुसळत असते. आपण गुदमरत असतो…गर्दी वाढत असते…इतर कोणत्याही वैयक्तिक बाबीसाठी जागा नसते. नुस्ती वाट पहात राहायची.

मग कुठेतरी एक लोंढा येतो व आपल्याला बाहेर फेकतो. आपल्याला तिथे उतरायचं नसते. मग पुन्हा त्याच गाडीसाठी आटापिटा.

कधी कधी दगडाला घट्ट चिटकलेल्या शेवाळासारखे आपण आत तगतो. मग थोडी गर्दी कमी होते. क्वचितप्रसंगी एखादी जागा बसायला मिळते. कधी चुकून खिडकी. मग एकेक सहप्रवासी कमी होऊ लागतात. शेवटी आपल्या स्थानाला आपण उतरतो.

हे सगळं होत असेल तुमच्याबाबतीत. पण कधी कधी असं माझ्या मनाच्या बाबतीत होतं. असेच ते कशाला तरी शरण जातं..कधी उगाच हेलकावे खाते.. कधी सयींच्या गदारोळात हरवतं तर कधी असंख्य सयीच्या वर्षावात गुदमरत. मग अचानक बांध फुटावा तसा मन हलकं होऊ लागतं. कधी शांत तर कधी नव्या आठवांची लडी उलगडत पुढे जाते. मनाची आवर्तने क्षणाक्षणाला बदलत राहतात. एखादी गुदगुदल्या करणारी आठवण बहरवून जाते तर एखादी हळवं करून जाते. मग वावटळ येऊन गेल्यावर आभाळात उडालेली धूळ पुन्हा धरतीवर यावी तसं मन पुन्हा सगळ्या आठवणी कवटाळून, त्यांना फडताळात त्यांच्या जाग्यावर ठेवून गपगार होते.

हे आयुष्याच्या बाबतीत होऊ शकते ना ?? तुम्हाला काय वाटते ? आयुष्याच्या प्रवासात कधी आपण अवचित एखाद्या स्टेशनवर उतरतो. जगण्याची इच्छा असताना. मरण थोपवता येत नाही म्हणून. आयुष्याची दोरी जर बळकट असली तर पुन्हा अपघातातून सावरून नव्याने प्रवास सूरू. कळत नकळत सहप्रवासी निघून जातात. आपण त्याच्या जागेवर.

असं काहीतरी मला वाटत राहते.

तुमच्याबाबतीत होत का असं कधी ??????????

कौतुक शिरोडकर | 19 July, 2008 – 12:55

हा मंद मंद पवनी सुगंध
सळ्सळले कोण, दर्वळला गंध
आली कोठुनी गेली कुणीकडे
उभे ठाकले हे कोडे खडे
मी भारलो अन ह्ररपलो
मजला करुनी बेधुंद धुंद…..बेधुंद धुंद
ती कस्तुरी ….ती कस्तुरी ….ती कस्तुरी ….
अवचित झलक दिसली अशी
नकळत पाडुन मजला फशी
मी शोधितो, धुंडाळितो
लावुन गेली नवा छंद छंद….नवा छंद छंद
ती कस्तुरी ….ती कस्तुरी ….ती कस्तुरी ….
फिरे दशदिशा चौफेर मी
दडली कुठे ना कळे कामिनी
मना एक ध्यास छवि पाहण्यास
आतुर जीव बेबंद बंद…बेबंद बंद
ती कस्तुरी ….ती कस्तुरी ….ती कस्तुरी ….
ही ओढ अनामिक खुणविते
जागेपणी जणु स्वप्न ते
फिरुनी पुन्हा ये एकदा
नयनास लाभो गुलकंद कंद…गुलकंद कंद
ये कस्तुरी ….ये कस्तुरी ….ये कस्तुरी ….

कौतुक शिरोडकर | 23 March, 2010 – 15:08

अज्ञात……
प्रत्येक माणसातला त्याला माहिती नसलेला ‘तो’
अज्ञात……
जाणवूनही न कळालेली भावना ………

व्यक्ताची भाषा;
अव्यक्ताची अभिलाषा……

प्रतिभा, प्रज्ञा, बुद्धी, श्रिया
एकाच अर्थाचे विविध पैलू..
ज्ञानवंतांनाही न कळालेल्या कितीतरी बाबी
रोज शोध लागूनही बरंच कांही बाकी…

कस्तुरीमृगासारखं. त्यालाही कुठे माहीत असतं की ज्याच्या शोधात तो सैरावैरा पळतोय तो गंध त्याच्याच नाभीतला आहे…. तसच असतं आपल्या सगळ्याचं. जगाच्या कानाकोपर्‍यात डोकावणारे आपण स्वतःमध्ये डोकावतच नाही. तेवढी एक जागा राहते शोधण्याची. पण आपल्यातलाच एखादा निघतो या अज्ञाताच्या प्रवासावर. या प्रवासात त्याला शब्द, संज्ञा, अर्थ, भाव, भावना….. असे कोणी ना कोणी भेटतातच. ती भेट वरवरची नसते. आत्म्याने परमात्याला साद घालावी तशी. कडकडून झालेली भेट…. आणि अशा भेटीत जन्म घेते एखादी कविता. जी मग मनामनात विखुरते. पेरणीस निघालेल्याने चौफेर भिरकावलेल्या बियाणासारखी. एखाद्या मनात तिला हवी तशी भुमी मिळाली की मग ती रुजते. अंकुरते, फुलते…….पुनःप्रत्ययाचा आनंद देत रहाते. पण अशी कविता रचणारा तो कवि मात्र ‘अज्ञात’. ते तसं का आहे ? …. याच स्पष्टीकरण वर दिल्याप्रमाणे…. कविच्या शब्दातच.

जगरहाट,
जीवनाचं, शोधांचं….
प्रत्येक आवर्तनात रिकामं होऊनही
नेटानं पुन्हा पुन्हा भरुन येणारं…..

कुठून येतं हे सारं ??
कुणालाच माहित नाही..

‘मी’ च्या शोधातल्या या प्रवासाचे लागेबांधे जीवनाशी, जगाशी जोडले जातात. त्याच्याही नकळत. त्या अनाम शोधाच्या वाटेवरला हा जीव ‘ को अहं ?’ च्या हाका मारत असतो. येणार्‍या प्रत्येक प्रतिसादाचं स्वतःच्या कुवतीप्रमाणे विश्लेषण करत पुढे पुढे जात राहतो. वेगळी, अनोळखी, कुतूहल जागवणारी वाट. या वाटेवर सोबत असली तर ती स्वतःचीच. भुतकाळाच्या उजेडाकडे पाठ करून भविष्याच्या अंधारसावल्या न्याहाळत जाणारा एक अगम्य अनभिज्ञ प्रवास…….. ज्याच्या उगमाचा नीटसा अंदाज नाही ही की त्याच्या अंताची कोणतीही खात्री नाही.

हाच काळपरत्वे केलेला वेगवेगळा प्रवास
म्हणजेच “अज्ञातकुळाच्या” कविता

माबोवर नियमित कविता वाचणार्‍यांसाठी हे नाव ‘अज्ञात’ नाही. कदाचित काही जणांसाठी हा कविही ‘अज्ञात’ नाही. माझ्या वर्षाखेरीच्या नाशिक प्रवासात त्यांची गाठभेठ झाली. काही गप्पा झाल्या. त्यांचा येऊ घातलेला अलबम ऐकला तोही कारच्या काचाआड. योग्य जागा. गर्दीतलं एकटेपण असावं तसचं. इथे फक्त कविता होती…. सुर होते…. ताल होता…… बोलणार्‍याचे शब्द आणि ऐकणार्‍याचा हुंकार. यात ‘नकोसं वाटावं’ अस काही आत झिरपण्यास जागाही नव्हती. सुर्याने नुकतेच डोळे किलकिले करून पाहण्यास सुरुवात केली. त्या सकाळच्या प्रहरी गुलाबी म्हणण्याजोगी थंडी होती. पण कारमध्ये मात्र पाऊस बरसत…रिमझिमत होता…. कवि नखशिखांत ओलेता आणि मी सरींवर सरी झेलत चिंब होत होतो. ही काही त्यांची मुलाखत नव्हे….. हा त्या भेटीचा, त्या आगळ्यावेगळ्या महफिलीचा सारांश….

“पश्चिमेचा सांजवारा” …… विषय साधाच. दोन शब्दात मावणारा…. अर्थ मात्र असीम…… शब्दबद्ध केलेली प्रत्येक भावना त्या शब्दांच्या परिघात व्यक्त होत असली तरी त्या भावनेची आभा त्या परिघाबाहेर असतेच. या प्रभावळीला परिघ नाही की तिची त्रिजाही सांगता यायची नाही. हेही तसेच. पण इथे मात्र याचा सदर्भ पावसाशी गुंतलेला. तसं माझं आणि पावसाचं जन्माचं नातं. आईला पहाटे जेव्हा कळा सुरु झाल्या तेव्हा प्रचंड पाऊस होता. गुडघाभर पाणी साचलं होतं. त्यातून वाट काढत हॉस्पिटलची वाट धरली होती. मी डोळे उघडले तेव्हा पाऊस ‘मी’ म्हणत होता. म्हणून पावसाशी माझं जन्माचं नातं.

प्रत्येक वर्षी गुंजणारा हा मल्हारराग मला कदाचित त्यामुळे नेहमीच नवा वाटतो. ‘नेमेचि’ येणारा असला तरी मला मात्र पावसाळा नेहमीच उंबरठ्यावरील मापटं उलटवून पहिल्यांदा गृहप्रवेश करणार्‍या लाजर्‍या-बुजर्‍या नववधूसारखा वाटतो. नुकत्याच प्रेमात बहरणार्‍या प्रेमवीराला त्याची प्रेयसी प्रत्येक भेटीत जशी नेहमी वेगळी व नवथर वाटते तसाच माझा दर पावसातला अनुभव. आकाशातले कृष्णमेघ, वातावरणातला गारवा, उल्हसित करणारी शीत हवा आणि मग बरसणार्‍या सरी…. पण प्रत्येक पावसात मला वेगळेपण जाणवते. मी ही तोच… तो ही तोच…. पण तो जलाधारांचा स्पर्श, ती अनुभूती….. जणू मी नेहमी नव्यानेच अनुभवतो.

अशा पाऊसवेड्या माझ्या मनाला मग पहिल्याच कवितेच्या पुढील ओळी ग्रीष्मातच नव्हे तर शिशिरातही सुखावतात. त्यात पं. शौनक अभिषेकी यांचा भिजलेला स्वर…….

नभ उतरून आलं झाल मेघाळ आभाळ
नव्या पावसानं नेलं सार्‍या जगाचं गबाळ
चिंब भिजले आकाश मोर झाली काळी माती
खुणावत अंकुरास वाहू लागला पन्हाळ

कुंचल्याच्या पहिल्या वहिल्या फटकार्‍यातच दुडदुडत येणारी ती पहिली सर डोळ्यासमोर उभी राहते. क्षणार्धात सगळं पाऊसचित्र भोवताली उभं राहतं. भरून आलेलं आभाळ, झेपावलेल्या सरी, ग्रीष्माचा दाह झेलून झेलून भेगाळलेली धरा, पोळलेल्या त्या देहावर फुंकर घालणारा पहिला वहिला थेंब, तो स्पर्श, त्या स्पर्शाने अक्षरश: नर्तन करू लागलेली काळी माती, मातीच्या ओलावल्या देहावरून ओघळणार्‍या ओहोळाने अंगावर ढलपं घेऊन निजलेल्या बियाणाला घातलेली शीळ…. हे नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. त्याला ती तशी ‘नजर’ असावी लागते. तो ‘चष्मा’ असावा लागतो. जे पाहीलं ते त्याच रुपात पुन्हा शब्दात गुंफून सादर करण्यासाठी जिव्हेवर त्या शब्दांचा राबता असावा लागतो. वर्षा-सहा महिन्यांनी भेटणार्‍या मित्राबाबत जिव्हाळा तेव्हाच वाटेल… जर तो मनाच्या अलवार कप्प्यात दडून बसला असेल तर… शब्द तसे असावे लागतात. तरच ते अशा अनुभूतीच्या वेळेस विजेच्या वेगाने अधरांकडे झेपावतात. शब्दांच्या वैभवाबद्दल बोलावं तर या बाबतीत कवि ‘कुबेर’ आहे हे मला नेहमीच वाटत आलय. तशी सगळी त्या शारदेचीच लेकरे. पण असते एखाद्या मुलावर तिची जास्त माया…. का ? ते तिचं तीच सांगेल…

सण ओलावल्या रानी म्हणे ‘पेर्तेव्हा’ गाणी
हिरवळल्या जमाती उतू गेला वनमाळ
मन रंगाची कमान भय जिरले गुमान
मल्हाराच्या बेटावर दरवळ सदाकाळ

सरींवर सरी बरसतात. अवघी सृष्टी चैतन्यमय होते. आधी सण घनात साजरे होतात आणि मग रानात… रानातून शेतात… मोकळा भकास सन्यस्त माळही हिरवळतो. अंगाखांद्यावर तृणफुलांची वाकळ घेऊन कुटूबवत्सल होतो. निसर्गातला थुई थुई नाचणारा आनंद बागडत मनात पोहोचतो. आभाळातली इंद्रधनुची कमान मनाच्या क्षितिजावर विराजमान होते. मन पाऊस होऊन दरवळतं.

उन्हा आली सोनकळा भला सजला श्रावण
फुलावर गोळा दंव घुमे सावळं कोकीळ
सुवासिनीचं माहेर गौर मंगला मंगल
झिम्म फुगडीचा फेर घर सुखाचा समेळ

उत्सव फेर धरू लागतात आणि उत्साह उतू जाऊ लागतो. श्रावण मंगलाष्टकं गाऊ लागतो. सृष्टी ताल धरू लागते. सुना पुन्हा लेकी होऊन मायेच्या पदराआड घुटमळू लागतात. परकरातल्या खेळांना सख्या सयांसोबत खोचलेल्या पदरासह पुन्हा आमंत्रण देतात.

शीण गेला मैलावर मंद पहाटेची वेळ
मोहरल्या सार्‍या वाटा विरघळला विव्हळ
वसु वासराचा पडे माझ्या अंगणात तळ
जिवाभावाचं वावर भरे रेशमाचं खळं

रिकामं घर भरतं. चार भिंतीना नव्याने घरपण येतं. एकटेपणाचा, त्याच-त्याच क्षणांचा मनाला विळखा घालून बसलेला शीण पागोळ्यांसोबत वाहू लागतो. मनातला आनंद हिंदकळला की मग घरादारात नांदतो. संवाद खुद्खुदू लागतात. किंचित कोमेजलेल्या नात्यांच्या वेलीवर अलवार शिंपण होते. हळूच एक पालवी त्यात नव्याने अवतरते. पाऊस मात्र बाहेर अजूनही बहरत असतो.

खरतर कवितांच्या नंदनवनात भटकत असताना मध्येच नेहमीच्या रुक्ष चर्चा नकोश्याच असतात. पण कधी कधी त्या टाळता येत नाही. शिवाय कवितांचा प्रवास गाण्यापर्यत कसा झाला हे जाणून घेण्याची उत्सुकता मनाला होतीच. जशी मला तशी तुम्हालाही असेलच. अज्ञातांच्या कविता ‘पश्चिमेचा सांजवारा’ होऊन संगीताच्या क्षेत्रात वाहायला लागल्या यामागे नेमके कष्ट कोणाचे हे जाणून घेणे ही महत्त्वाचेच. फूल फुलते.. गंध पसरतो…. पण तो तेवढ्या भागापुरताच मर्यादित रहात नाही… संपुर्ण परिसर त्या गंधाने धुंद होतो. ही किमया वार्‍याची…. अज्ञातांच्या अज्ञात कविता ज्ञात होण्यामागे नेमकं कोणं हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा मनात येणं साहजिकच होत म्हणा.

यात पहिलं नाव प्रकर्षाने आलं ते श्री. धनंजय गोवर्धने यांच. (कवी-लेखक-फाईन अर्टिस्ट-फोटोग्राफर्-फिल्म मेकर – ते स्वतःच एका वेगळ्या लेखाचा विषय आहेत.) कवितासंग्रह छापावा ही त्यांची कल्पना. पण वैयक्तिक ओळखीमुळे आपण कवितांची तटस्थ निवड करू शकणार हा त्यांचा अदमास. मग हे कार्य मुक्तविद्यापीठातील डॉक्टरेट मित्राकडे सोपवण्यात आलं. पण वेळेअभावी त्यां मित्राला मुहुर्त मिळाला नाही. त्यानंतर श्री. मिलिंद जोशी (कमर्शियल आर्टिस्ट), श्री. विनायक रानडे (कमर्शियल प्रिंटर), स्वत: कवि आणि श्री. गोवर्धने यांच्या बैठकीत दृकश्राव्य माध्यमाचा पर्याय निघाला. कवितांच्या कथेवर श्री. गोवर्धने यांनी फिल्म बनवायची, संगीतकार मकरंद हिंगणे यांनी सगीत द्यायचं आणि भुमिका स्वतः कवीने करायची. याला कवीचं नाटकाचं अंग कारणीभूत ठरलं. जाहीरात व इतर व्यवहाराच्या बाजू श्री. जोशी व रानडे यांनी खांद्यावर घ्यायचं ठरवलं. पण कवि मात्र अज्ञातच असावा ही कवीची भुमिका अनिच्छेने का असेना इतरांनी मान्य केली. खुद्द नाशिकात अज्ञात यांना कवि म्हणून ओळखणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आहेत. पण त्यांच्या ट्रॉफी व मोमेन्टो बनवायच्या कार्यक्षेत्रात त्यांचा बराच दबदबा आहे. त्यांच्या www.layakari.com या वेबसाईटवर सगळा प्रपंच उपलब्ध आहेच. असो.

पहिली कविता तेवढ्यापुरती संपते. आता तिला नवं घर मिळालेलं असतं. नव्या पाहुण्याच्या स्वागतात मन रमते-न्-रमते तोच श्री. चारुदत्त कुलकर्णी यांचा धीरगंभीर आवाज भोवताल व्यापतो.

काळासोबत गुरफटलेलं नात्यांचं जोतं
खांद्यावरून उतरलं की विरघळून जातं
संपृक्त तेवढंच आठवणीत रहातं
वय कातर होतांना काठावरती येतं

‘वय कातर होताना’ या एका बाबतीत मी कवीशी सहमत होत नाही. हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. वयाचं माप इथे लावताच येत नाही. प्रवास म्हटला की सहप्रवासी आलेच. सहप्रवाश्यांशी जडणारं नातं. एखादं स्थानक येतं. कधी आपण तर कधी सहप्रवासी उतरून जातो. प्रवास चालु राहतो. नवा प्रवासी शेजारी येऊन बसतो. नव्या गप्पा रंगतात. आधीच्या गप्पात गवसलेला सुर त्यात असतोच. बोलण्याच्या ओघात त्या आधीच्या प्रवाश्यासह केलेल्या गप्पातील काही ना काही आठवतं. त्यातला संदर्भ येतो. उतरुन गेलेला प्रवासी त्यामुळे पुन्हा आठवतो. आपला प्रवास संपेपर्यंत हा एक वेगळा प्रवास चालू असतोच. गप्पांचा, वादांचा, ओळखींचा, आठवांचा…….

संगीतकार मकरंद हिंगणे नव्याने तार छेडतात. दुसरी कविता लयबद्ध होऊन पदन्यास करत येते.

एकवेळी पावसाळी भेट ही झाली अशी
वेदना भिजली तळाशी उमलली गोंडस कळी

एखादी सांज पुन्हा पाऊस आपल्या कुशीत घेतो. तो तिला कवटाळून कुरवाळत असताना भिजलेलं मन जुन्या आठवणीत रमू लागतं.

भर पावसाळ्यात एकदाच अवचित दिसलेली ती….., जाता-जाता पाठमोरा वळून.. ओसंडणारं हासू आवरत… सुखावून गेलेला तो…………, बालपणी लपाछपीच्या खेळात दडलेली व पुन्हा कधीही न दिसलेली एखादी बालमैत्रिण………., एका कटींग चहासोबत फुंकलेली अर्धी सिगरेट तशीच अ‍ॅशट्रेमध्ये तशीच सोडून गेलेला मित्र……….., दुरवर चालता-चालता अचानक हात सोडून वेगळ्या वाटेवर गेलेला सोबती, सायकल शिकताना पाठीमागे सीट धरून धावणार्‍या अन आता गाडीच्या पाठच्या सीटवर हक्काने बसू इच्छिणार्‍या बापाची रिकामी झालेली जागा…….., रात्रभर उशाशी जागी आई आता कायमचे डोळे मिटून निजलीय याची खोलवर रुजलेली जाणिव……,

……..पावसाच्या सरी मनाच्या घळीतल्या अंधार्‍या कपार्‍यातून नागमोडी वळणं घेत सुकल्या, दुर्मुखलेल्या काठांना भिजवत जातात. आत खोलवर दडलेलं काही ओलावतं, सुखावतं आणि वेदनेच्या त्या अंकुराला पालवी फुटते.

पंख मेघांचे जणू आकाशवेडी पाकळी
पाय मातीचा भरारी मात्र अवखळ मोकळी

क्षणांसाठी पंख फुटलेल्या मुंग्याचे थवे पावसात भिरभिरू लागतात. पंख लाभताच आकाशाकडे झेपावू लागतात. जशी सरींचा ओलावा लाभताच वेदना उमलून वयात येते आणि सगळ्या बंधनाना विसरून बाहेर झेपावते. पण… मुंग्याच्या त्या पंखात इतकं बळ नसते की त्या त्यांच्या आकाशाला गवसणी घालण्याच्या स्वप्नाला पुर्ण करू शकेल. त्या पुन्हा मातीत कोसळतात. पण तो अवखळपणा काही संपत नाही. पुन्हा झेपावणं चालूच असतं. या पावसाळी वेदनाही तशाच. त्यांना दिलासा हवा असतो. पण त्या जाऊन जाऊन जाणार कुठे ? जुन्या काळात… क्षणभरासाठी… मन, देह सगळं त्या काळात रुंजी घालू लागतं. मग त्या पुन्हा परततात…. जुन्याच कोषात. भुतकाळ बदलता येत नसला तरी तो बदलण्याची इच्छा पुन्हा पुन्हा जन्म घेत राहते. क्षणभंगूर असली तरी भावना हवीहवीशी असते.

बिल्वरांच्या दहिवरांनी भरून गेल्या ओंजळी
आंसवे विसरून गेली खार त्यांचा वेंधळी

एकदा का स्वतःची हतबलता जाणवली की मग मनाला आलेली भरती डोळ्यांपर्यतं पोहोचते. येनकेनप्रकारे तो उचंबळ बाहेर येऊ पाहतोच. आठवांचे, जाणिवांचे प्रतिबिंब, बिल्वरासारखे, ओघळणार्‍या प्रत्येक आसवात पुन्हा दिसू लागते. सरणार्‍या चित्रफितीसारखे ते क्षण आसवातून डोळ्यासमोर सरत जातात आणि मग हलकं होणारं मन त्या आसवातील क्षार विसरून पुन्हा त्याच्या नेहमीच्या जगात परतू लागतं.

मनाची जडणघडण किती विचित्र ! बरसणार्‍या सरींचं आसवांशी नेमकं काय नात असावं हेच कळत नाही. कुठे ना कुठे… कधी ना कधी…. एखादी सर मनाला एकांतात गाठतेच. मग ती त्याच्यासवे बोलते, त्यातील एखादा चर कोरते, आतल्या तटबंदीमागे साकळलेलं वाट मो़ळळी पाहताच उसळतं आणि शेवटी मन सरीसोबत नातं सांगत डोळ्यातून बरसतं.

आपल्याच नकळत पंडीतजींचे स्वर आपल्या मनातला एक कडीकुलपात कोंडलेला कोनाडा परवानगीशिवाय खोलतात आणि आपण मग त्या कोनाड्यातल्या एकेका क्षणाला पुन्हा आत कोंडून घालण्याचा प्रयत्न नव्याने करू लागतो. एखादा थेंब ओघळतोच. इथे आम्ही जरा विसावा घेतो. गारठ्यात घेतलेला वाफाळलेला चहा पुन्हा पुन्हा हवाहवासा वाटतो. बेहद आवडणारा जिन्न्सा पुन्हा पुन्हा जीभेवर घोळवावासा वाटतो. कवि कवितेबद्दल बोलू लागतात. कविता पुन्हा समोर साकारते. नव्या रुपात, नव्या ढंगात, नव्या रंगात. आधी न उलगडलेले अनेक पदर आता उलगडतात. कविता मुळ धरू लागते. तिला नवी पालवी फुटू लागते. तो परिमळ जाणवू लागतो……………………

यानंतरचं काम म्हणजे कविता निवडणे. १६०० कवितांच्या गठठ्यातून श्री. गोवर्धने यांनी आठवड्याभरात ३०० कविता नक्की केल्या. वाचनाचं कार्य अर्थात कवीमहाशयांचं.

श्री. मकरंद हिंगणे हे पं जितेंद्र अभिषेकी यांचे गुरुकुल शिष्य. संगीत विशारद, पंचवटी कॉलजमध्ये संगीत विभाग प्रमुख. स्वतःचे संगीताचे वर्ग, काव्यप्रेमी, गाण्यातलं काव्य जपण्याचं भान असलेलं व्यक्तीमत्व. त्यांनी दोन सीडीजच्या हिशेबाने ३०० कवितांपैकी १६ कविता निवडल्या. गाण्यांचे ट्रेक रेकॉर्ड झाले पण स्वत: कवीवर्य तिकडे फिरकले ही नाहीत. मग एका रात्री श्री. हिंगणे यांनी फोनवर अज्ञातांना कळवलं की दोन गाणी स्वत: पंडीत शौनक अभिषेकी गायलेत. मग उरलेली सहा गाणी आपणं गाणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी म्हणताच, अभिषेकींनी त्या गाण्यांसाठीही वेळ दिला. त्यानंतर पंडीतजींनी कवीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि भेट झाली. त्यांच्या गप्पात देवकी पंडीत गाणी गाण्यास उत्सुक असल्याचं कळलं. पण ठरलेल्या ट्रॅक्समध्ये ऐनवेळी बदल शक्य नसल्याने हा योग हुकला. कदाचित पुढच्या सीडीत हा योग येईलही. कोण जाणे !

आणि पुन्हा तोच धीरगंभीर आवाज…

लाट येते जाते, खूण खुणा होते
वाहता वाहता घेणार्‍याला गहिरी साद देते

नितळ कधी गढूळ कधि घाट कधि सपाट
वाट शोधित आखाताशी एक रूप होते

जळाच्या काठाशी बसणार्‍यांनी लाटांचा खेळ पाहीला असेलच. एखाद दुसरा दगडही पाण्यावर भिरकावला असेल. एका लाटेला छेदत तो दुसर्‍या लाटेवर आरुढ होऊन पलिकडे गेलेला पाहीलाही असेल. पण कधी त्या लाटांच गुज ऐकण्याचा प्रयत्न केलाय का ? कधी या लाटा बरचं काही सांगून जातात. फक्त ऐकणार्‍याला ती भाषा कळायला हवी. किनार्‍याला येऊन भिडणारी लाटांची आवर्तने त्यांच्या गमनागमनाची खूण ठेवून जातात. ती खूण सागराच्या हद्दीच्या खुणा होतात. किनार्‍याकडे झेपावणारी प्रत्येक लाट सांगराच्या अंतरंगातील खळबळीस पृष्ठभागावर परावर्तित करते. जसं मन कधी कधी मनातील चलबिचल चेहर्‍यावर प्रतिबिंबित करते. लाटांचे बोल ज्यास समजतात, त्याला मग सागराच्या अंतरीची हाकही ऐकू येते. जसा जिवलगाला आपल्या चेहर्‍यावरून आपल्या मनातील अचूक स्पंदनांचा स्पर्श होतो.

लाटांची रुपे प्रत्येक वेळेस वेगळीच. कधी नुसतच नितळ पाणी तर कधी मात्र त्या सोबत वाळूही. कधी ती येते उचंबळत, खळखळत तर कधी हलकेच गर्दीतून डोकावून पहाणार्‍या एखाद्या उंच माणसासारखी मान उंचावून पाहात येते. सरतेशेवटी किनार्‍यावर पोहोचलेली लाट पुळणीत विरते वा मागे सरुन दुसर्‍या लाटेत विलिन होते. मनातल्या आवर्तनासारखं. कांद्याला सोलत जावं आणि शेवटी डोळ्यात आसवांशिवाय काही न उरावं तसच. सुख-दु:खाच्या आठवणी एकमेकीला धरून अशाच येतात. भुतकाळाच्या भक्कम पायावर उभा असलेला वर्तमानाचा क्षण पापणी लवण्याआधीच खालच्या पायात समाविष्ट झालेला असतो. भुतकाळाचा थर वाढत जातो.

लाटांच किनार्‍याशी नातं असतं. एक अशब्द नातं. आवेगाने रौद्र रुप धारण करत, अक्राळविक्राळ तांडव करत येवो वा संथपणे एखाद्या रमणीसारख्या लयबद्ध हालचाली करत येवो, सरतेशेवटी किनार्‍याशी आली की लाट शांत होते आणि सगळी ख़ळब़ऴ बाजूस सारून शांतपणे त्याच्या मिठी एकरूप होते. या मुक्या नात्याचं लाघव जाणवलय का कधी ?

पुन्हा तार छेडली जाते. नवे गीत उमलते.

मुक्या कळ्यांची फुलली नाती
कुठे उमलली मधुवंती
रानामधल्या उजाड राती
अखंड स्फुरल्या स्नेहल वाती

पावसात रमता-रमता कवि इथे अंतर्मुख होतो. स्वतःला शोधता शोधता वेगळ्याच वाटेवर पोहोचतो. पंचमहाभुतापासून बनलेला देह भरकटून पुन्हा निसर्गाच्या वाटेवर गेला तर त्यात नवल ते काय ? बहरलेला भोवताल त्याला रमवू लागतो. मनाच्या आवर्तनातीला एका आवर्तनाचे दुसर्‍याशी असलेले लागेबांधे शोधण्याचा हा प्रवास निसर्गात ठायी ठायी आढळणार्‍या अबोल नात्याशी येऊन क्षणभर स्थिरावतो. पानाआड लपून बहरणार्‍या कळ्या आणि उमलणार्‍या कळ्यांचा दरवळ…. कळ्याफुलातील अनामिक नातं…. अनुत्तरीत… इथे शास्त्राच्या फुटपट्ट्याही निकामी ठरतात. काळ्याभोर अमवास्येच्या उजाड रातीत कुठे प्रकाशाची तिरिपही नाही. चंद्र नाही की चांदण्या नाही पण त्या अंधाराला छेदायला आहेत असंख्य काजव्यांच्या राशी. त्यांचा तो शीतल स्नेहल प्रकाश भिरभिरतो रानावनात, झाडापानात, मनामनात.

निसर्गाचं प्रतिबिंब मनात आहेच की. मनात उमलणार्‍या भावना नकळत कुठे ना कुठे नाते जुळवून जातात. या भावनांच एकमेकींशी असलेलं नात वेगळं. उदास भकास एकांतात अचानक मनात एखाद स्फुलिंग जागृत होतच. रात्रीच्या गर्द आकाशात अचानक काहीतरी सरसरत वर गेल्यासारखं वाटतं. तेव्हा वर पहावं तर एक ठिणगी दिसते. मग एक प्रकाशाचा लोळ…. त्याचा तो आवाज… आणि मग सहस्त्रावधी रंगीबेरंगी ठिणग्या. दिवाळीतील आतिशबाजी. मनातही हा अविष्कार घडतो कधी ना कधी. एखाद्या उजाड एकांतात. मनासह गात्रेही चिंब होतात.

झाडाखाली सदा सावली
फांदी फांदी प्रीती प्रीती
कुशीतला विश्वास असा की
फिरकली कधी न अवती भीती

विस्तारलेल्या झाडाच्या खाली पांथस्थालाच नव्हे तर झाडाखाली अंकुरलेल्या कोवळ्या कोंबानाही त्या सावलीचा आधार आहे. आईच्या कुशीत तिच्या बाळाला असावी तशी सुरक्षितपणाची भावना त्यांच्या मनातही आहे. सावलीच्या आशेने आलेल्या व सावलीतच जन्म घेणार्‍या कोंबाचे झाडाशी नातेच वेगळे.

एकटया जीवाला मनाचा आधार. अंधार दाटला की सावलीही सोबत सोडतेच. पण मन असतच सोबतीला. धीर द्यायला. कोणत्याही परिस्थितीत. भेदरलेल्या आत्म्याला तेवढाच ‘कुणीतरी आहे’ असा विश्वास. मनाने एकदा ताबा घेतला की भावना अस्तित्व व्यापू लागतात. अशात जर एखादी हवीहवीशी तार छेडली गेली तर…… कुठूनतरी कानावर मधूर गाण्याचे सुर जरी कानावर आले तर आपण ओळी गुणगुणायला लागतो. मनात काही वेगळं घडत नाही. एखादी सुक्ष्म तार छेडली गेली की झंकारांचा प्रतिध्वनी रंध्रारंध्रात तोच ताल भरून उरतो. त्या हिंदोळ्यावर हेलकावताना मग जोजवणारी भीतीही स्पर्श करत नाही.

आज अचानक तीच मिसळली
वारा होउन अवती भवती
गंध उधळला रंग लेउनी
तिलाहि भाळुन गेली नियती

धुंदावणार्‍या वार्‍यावर जेव्हा एखादी फुललेली कळी स्वार होते. तेव्हा मग ती तिची उरत नाही. तिला स्वतःच असं अस्तित्व राहत नाही. देहातला आत्मा जसा पुन्हा पंचमहाभुतात विलिन व्हावा तशी तिही वार्‍याशी एकरुप होतू पहाते. तिचं हे एकरुप होणं जाणवतं ते तिच्या गंधातून. तो गंध आसमंतात पसरतो. तिचं अवतीभवती असलेलं अस्तित्व जाणवून देतं. मग आपणही अंतरीचा मागोवा घ्यावा तसा त्या गंधाचा मागोवा घेतो. गंधाची गमत वेगळीच. तो वरवर राहत नाही. तो आत जातो. खोलवर. आपल्याच नकळत, आपल्यात तो गंध त्याची पाळमुळं शोधू लागतो. गंध ओळखता आला तर मग समोर दृश्य प्रतिमा साकार होते. तो आकार, ते रंग…. नजरेला जे जाणवते तेच. मग प्रतिमेला जोडून नवी प्रतिमा…. प्रतिमांची एक मालिकाच… भराभर नजरेसमोरून जाते….. माणूस आठवणीत हरवून जातो.

भावना दिसत नाही. त्यांना स्पर्श करता येत नाही. त्या फक्त जाणवतात. कधी कधी तर शब्दातही व्यक्त करता येत नाही. एका मनाच्या दुसर्‍या मनाला तेव्हाच जाणवतात जेव्हा त्या दोन मनात एक सुक्ष्म नातेबंध असतो. मुलगा पडला की त्याच्या जखमेतून रक्त येण्याआधी आईच्या डोळ्यात पाणी आणि ओठात ‘सांभाळ’ आपसूक यावं तसा नातेबंध. भावना आकार घेतात. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक हुबेहुब आपल्याच आकारात, रंगरुपात दिसतात. आरशात पहाव्या तशा. मग त्याच खर्‍या वाटू लागतात.

दिसे न कांही तरी सोबती
अमर क्षणांची येई भरती
अश्रू हीच फुले श्रद्धेची
पाउल पाउल माती माती

वार्‍याला समर्पित झाल्यावर कळीचं जिवितकार्य संपन्न होते. ‘काहीतरी देऊन गेलो’ एवढचं तिला पुरेसं. तो एकमेव क्षण तिला अमर करून जातो. तिच्या त्या बलिदानावर फुलं तरी कुणी वाहायची ? मातीतून आलेली ती मातीत मिसळून जाते. पुन्हा जन्म घेण्यासाठी. कदाचित निसर्ग अश्रू ढाळत असेल तिच्यासाठी. दवरुप घेऊन.

भावनाबद्दल बोलत होतो मी मघाशी…. अदृश्य सोबती…. ‘ट्रिगर दाबताच गोळी सुटावी’ तसा ट्रिगर दाबला जातो…… कशानेही…… भावना उचंबळून वर येतात. म्हणजे कुणाला तरी भेटण्याची आस असते. कामाच्या व्यापात ते शक्य होत नाही. चालढकल होत राहते. मन तीळ तीळ तुटतं. आणि मग एकदाचा तो क्षण येतो. भेट होते. कधी निशब्द तर कधी भरभरून……. आणि मग इथे भावना बोलकी होते. शब्दात नाही. अश्रूत… आनंदाच्या… कधी दु:खाच्याही…. मनात असलेली भेट झाल्यावर दु:खाश्रू कशाला ?… असं वाटल का ? पुन्हा कधी भेट होईल याची शाश्वती आहे का कुणाला ? त्या अश्रूत कुठे तरी हा भाव असतोच. दु:खाची झालर असलेला. अश्रूंचा बांध फुटतो पण त्या अश्रूंचं स्पष्टीकरण झणी देता येत नाही. पण तो क्षण तो मात्र कोरला जातो मनाच्या पटलावर. ‘पाऊल पाऊल माती माती’ हे नातं फार वेगळं आहे. मातीतून जन्मास आलेला मातीत जातो.हे नातं कधीही दुभंगू शकत नाही. नातं असलं तर अस हवं तेव्हाच तर ती भावना वेड्यागत डोळ्यातून वाहेल ना….. नुसत्या कोरड्या नात्यांचा काय उपयोग ? भक्ताचं भगवंताशी, पालकांच मुलांशी, त्याचं तिच्याशी, मित्राचं मित्राशी…… नात असं हवं ज्याला दुभंग माहीत नाही. यात असतो तो फक्त अभंग….

गाणी झाली. एडिटींग झालं. आता प्रश्न होता निवेदनाचा म्हणजेच मधल्या जागा भरून गीतांची जोडणी करण्याचा. अज्ञातांनी सांगितलेला क्रम श्री. मकरंद यांच्या क्रमाशी जुळला आणि श्री. धनंजय गोवर्धने यांनी अनुमोदन दिले. मग निवेदन लेखन व निवेदन या दोन्ही गोष्टी दोघांच्या संगनमताने अज्ञातांच्या गळी पडल्या. आता कविता लिहीणं हा ‘प्रोसेस’ पुर्ण वेगळा. आतून येणारा. पण निवेदनाचं तस नाही. ते ठरवून लिहावं लागतं.. काय लिहावं, कसं लिहावं, किती लिहावं, गद्य असावं की पद्य असावं, धागा कसा असावा…… विचार विचार विचार… म्हणजे फक्त जन्म दिला म्हणजे काम संपत नाही. पुढे पुन्हा पालनपोषणाच्या जबाबदार्‍या आहेतच. शेवटी एकदाचा मजकूर निश्चित झाला.

वार्‍याचा गारवा माळावरती मारवा
गंध ओल्या झुळुकेचा घुमतो व्याकुळ पारवा

कळीपाठी नवी कळी रोज तशीच तरी वेगळी
सरींसोबत पागोळी पाण्यावरती रांगोळी

मनाची अस्वस्थता दिशांचे संदर्भ बदलून टाकते. वार्‍यातला गारवा, रखरखलेल्या माळावरची अनामिक हुरहुर. अनोळखी गंध वाहून आणणारी एखादी झुळुक, घुमणार्‍या पारव्याचा चित्कार…. सगळे संदर्भ मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतात. मन आनंदी तर जग आनंदी… मन कष्टी तर जग कष्टी. ‘रोज तशीच तरी वेगळी’…जीवनचक्रातला एक महत्त्वाचा धागा या ओळीत आहे. हे विधान निव्वळ एका कळीसाठी नाही हे सांगण्यासाठी पांडित्याची गरज नाही. जे रोज आहे त्यात वेगळेपण शोधण्यात आयुष्य खर्ची पडतं. कधी ते क्षणाच्या दहाव्या भागातही गवसतं तर कधी ते गवसण्यासाठी आयुष्य क्षणभंगूर ठरतं.

पावसाचा आनंद घ्यावा म्हटल तर झेलण्यासाठी इथे नुसत्या सरीच नव्हे तर त्या सरीनी एकत्रित येऊन निर्मिलेली पागोळीही आहे. जितकं झेलाल तेवढा त्याचा मनमुराद आस्वाद घेता येईल. नाहीतर मग ती नुसतीच पाण्यावरची रांगोळी पाण्यासोबत वाहून जाईल. जीवनाच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेण्यावर आहे. क्षण येतात आणि जातात. आपण त्यातले नेमके कोणते जगतो ते महत्त्वाचे. जगण्याच्या नादात कधी कधी जगणं हरवून जातं.

पुन्हा आसमंतात धुंदावणारं संगीत आणि तेच भिजलेले सूर…

बरसुन गेला श्रावण सरला मेघ
नभातिल नितळ जाहले तारे
येउ घातले शुभ्र हिमाचे
शीत गुलाबी वारे

पांघरून दंव गोंडस
हसले तृण हिरमुसणारे
तरारली रंध्रातुन अवघी
मोगरी शिवारे

मदनगंध रंगात नाहिले
रेशिम हुळहुळणारे
स्वप्नाविण सृष्टीत पाहिले
हवे हवेसे सारे

हे एक शब्दचित्र. शब्दचित्रात अज्ञात माहीर आहेत याची इथल्या अनेक वाचकांना जाणिव आहेच. आधी वाटल होतं… या कवितेच्याही अंतरंगात शिरावं…. कविता कशी चकतीवरच्या पांढर्‍या रंगासारखी भासते. पहाताक्षणी त्यात तेवढा एकच रंग आढळतो. पण मुळात तसं नसतं कधी कधी. या पांढर्‍या रंगात सात रंग दडलेले असतात. ती चकती गरगर फिरवली तरच नजरेस पडतात ते. तेवढा तो फिरवाफिरवीचा त्रास घ्यायला हवा. त्याशिवाय तिच्या अंतरंगातले रंग उलगडायचे नाही. पण या कवितेबाबत हा प्रकार मी करणार नाही. जळाची मजा अनुभवायची असेल तर नेहमीच त्यात उतरलचं पाहीजे अस आहे का ? नाही ना. मग.

म्हटलं या चित्राचाच आस्वाद घ्यावा. श्रावणातील एक धुंद नितळ रात्र, हवेतला गुलाबी गारवा, त्या रात्रीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत उगवणारी पहाट, गवतफुलांवर ओथंबून राहीलेले दवं, फुलारलेली शिवारे… हे इतकं पुरेसं आहे नाही मनाच्या गाभ्यातील अलवार रेशिम हुळहुळण्यासाठी… अशा वातावरणात ज्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होत नाहीत त्याच्यासारखा अरसिक तोच म्हणावा. अवतीभवती इतकं काही असेल तर डोळे मिटण्याची गरज काय ? उगाच झोपायचं.. स्वप्नांची वाट पहात… मग स्वप्नांच्या गावाला जाऊन तिला वा त्याला भेटायचं…. कशाला एवढा टाईमपास…. इथे प्रत्येक गोष्ट तिच्या वा त्याच्या प्रतिकात्मक स्वरुपात आहेच. देखनेवाली नजर चाहीए असं म्हणतात ते काही खोट नाही. दिलसे .. प्रयत्न करून तर पहा.

नाटकात अनेकदा भूमिका करूनही अज्ञातांना त्यांच्या आवाजाबद्दल कांहीच कल्पना नव्हती. रेकॉर्डिंगला तो योग्य वाटेल किंवा नाही ह्याची खात्री नव्हती. नाशिक आकाशवाणीवरील निवेदक श्री. जयंत ठोंबरे किंवा श्री. धनंजय यांच्या ओळखीने श्री. किशोर कदम यांना विचारावं असाही विचार झाला. परंतु स्वत: कवीने वाचलेली कविता वा निवेदन हे इतर कुणाहीपेक्षा जास्त प्रभावी होईल आणि समजा नाहीच पूरक झालं तर दुसर्‍या कुणाचा विचार करता येईलच ह्या श्री. मकरंद यांच्या ठाम मताला अनुसरून अज्ञातांच्या ट्रायलचा निश्चय पक्का झाला.

आयुष्यातलं स्टुडियोतलं पहिलं रेकॉर्डिंग !! हवाबंद खोलीत, श्वासाचीही नोंद घेणार्‍या माईकसमोर, कानाला इयरफोन लावून अज्ञात. गाण्याचा ट्रॅक सुरू होऊन संपला की निवेदन करायचं. झालेलं ऐकायचं. ओके झालं की पुढचं गाणं. ट्रायल जमली. आवाज बरा वाटला. श्री. मकरंद, श्री. धनंजय आणि रेकॉर्डिस्ट श्री. प्रशांत पंचभाई यांचं आवाजावर आवाजी एकमत झालं आणि कामाला सुरुवात झाली. कानात तानपुरा घुमायला लागला आणि अज्ञातांनी स्वर लावला. कधीतरी केलेला गाण्याचा रियाज कामी आला. गाण्याच्याच पट्टीत निवेदन होणं गरजेचं असल्यानं तानपुर्‍याचा साज !

पहिला टेक झाला. बघणार्‍यांचे चेहरे हसरे वाटले. अज्ञात संभ्रमातच. एकेक करत सर्व जागा भरल्या गेल्या. संपूर्ण सीडी निवेदनासहित पहिल्यांदाच सद्गदीत होऊन त्यांनी पूर्ण ऐकली. बहुतेक सर्व पहिल्याच टेकमधे ओके झालं. कांही शब्द; विशेषतः शेवटचे; जे बोलण्याच्या ओघात स्पष्ट येत नाहीत ते दुरुस्त केले. आता वापरलेले वाद्यांचे बॅलंसिंग, बॅक्ग्राउंडला हर्मनीसाठी बेस गिटार, निवेदन आणि गाण्यांचं योग्य मिक्सिंग्-फेड इन फेड आउट करणे बाकी होते जे काम संगीतकार आणि रेकॉर्डिस्ट्चे होते.

मुकी आंसवे कशी शोधिती
पाण्यामधली गांवे
मुळी न आहे थोडेसेही
इंगित मजला ठावे

कसे कळावे स्पर्श कोणता
झुळुक हळूच सुखावे
एक मात्र रंध्रात पान्हवे
परिमळ वाटे गावे

नकोस येऊ पुढे कधीही
असे सदाही व्हावे
बंधित आणि चिरंजीव मी
नावे तुझ्या रहावे

कवितेच्या गावी गेलो की गद्यातले निवेदन मग नकळत पद्याकडे वळते. त्यातही निवेदनकर्ता स्वतः कवी असेल तर.. एका कवितेची पार्श्वभुमी सांगणारी दुसरी कविता. खर तर हा एक हल्का अनुभव. प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. याला या भुतलावर कुणी पारखा असेल असं मला वाटत नाही. फक्त त्याची नोंद घेतली गेली असेलच असं नाही. घेतली तरी अशा अलवार शब्दात नसावी आणि असलीच तरी मी त्या वाटेवरचा पांथस्थ कधी झालो नसेन. तसा प्रश्न शब्दांचा वा भाषेचा नाही. भावनांचा आहे. तू आहेस आणि तुझ्याशी मी निगडीत आहे एवढं पुरेसं. हा प्रेममार्ग असो वा भक्तीमार्ग…. संदर्भ तोच. वाट वेगळी… दिशा वेगळी…. शेवट तोच. एखाद्याची आठवण, एखाद्याचा ध्यास…. यात जर आकंठ डुबलो तर मग काय ? जळात डुंबलेल्या माणसाच्या भोवतीच नव्हे तर नाकीतोंडीही पाणीच. मग जो ध्यास मनाला लागला त्यात जर आकंठ बुडालो की मग तो व्यापतोच आपलं अस्तित्व. अशावेळी ज्याचा ध्यास आहे त्याची अनुपस्थिती जाणवत नाही. कारण तो आहे… आपल्याच रंध्रारंध्रात्…वेगळा असा नाहीच.

झरले नभ हिरवळले कातळ
भिजू लागले शेत
जुनेच स्वर अंकूर नव्याने
गाउ लागले गीत

मेघसरी पोटात उसासे
होउ लागले शीत
विझलेली धग गंध उमलली
बंधन आठवणीत

जळासवे वाहिली वेदना
पण घडले विपरीत
सुखावली वसुधा; पण झाले
व्रण उघडे धरणीत

रसग्रहण करायलाच हवं का ? नाही ना. पण तरीही करतोच. पुन्हा पाऊस, त्यात कातळांवर अंकुरलेलं शेवाळ… (दगडाला पाझर म्हणतात तस तर नाही ना ? ) आणि पावसासोबत जुनीच प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु होते. बरसणार्‍या सरी भेगाळलेल्या धरेकडे झेपावतात. भेगा पाणावतात. धग शांत होते. मृदगंध पसरतो. पाण्याचा भर ओसरतो आणि या भेगा स्पष्टपणे जाणवतात. पण हे एवढ्यावर संपत नाही. ओघळणार्‍या आसवांनी आतला आठवणींचा कातळ सैलावतो. त्या क्षणांची हिरवळ हळूहळू पृष्ठभागावर येऊ लागते. पुन्हा जुन्या खपल्या खरवडल्या जातात आणि आठवणी डोकं वर काढतात. सल असतात काही. कायम सलत राहणारे. आसवांचा एक सडा त्यांना सुखावून जातो. सल ताजा होतो. कोंब फुटावा तसा बाहेर येऊ लागतो. वेदनेची तीव्रता जाणवली की मग आसवांचा पूर येतोच. मग पूर ओसरताच थोडं बरं वाटू लागत. जीव शांत होतो. पण नकळत तो जुना जाणता सल मात्र या निमित्ताने पुन्हा ताजा होतोच. त्याचं काय ? म्हणतात ना की जगात ७५ टक्के पाणी आहे आणि शरीरातही. शास्त्रसंमत आहे ते. मग कवितेतल्या निसर्गाची नाळ मनाच्या तळाशी जुळली तर नवल ते काय ?

डी जी स्टुडियोचे मालक श्री. दीपक घारापूरकर, तसे अज्ञातांचे मित्रच. पण त्यांनाही कवी अज्ञात कोण हे त्या दिवशी कळलं होतं. श्री. मकरंद यांनी अज्ञातांना दिलेला शब्द चोख पाळला होता. श्री दिपक यांचे वडील पं. गजानराव उर्फ काका घारापूरकर यांचं अज्ञातांवर गेल्या पस्तीस वर्षांपासून, वारंवार न भेटूनही आणि संगीत क्षेत्राशी फारसा जवळ नसूनही, त्यावेळी अज्ञातांच्या पहिल्या वहिल्या संगीताच्या कार्यक्रम आयोजनानिमित्ताने झालेल्या सौहर्दपूर्ण वादामुळे विशेष प्रेम. त्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी कौतुकाने भरभरून आशीर्वाद दिले. अज्ञात त्यांच्या चरणी आदराने लीन झाले. आठवडाभरात संगीताचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि पहिली सीडी रेकॉर्ड झाली. मग अज्ञात. श्री. मकरंद आणि श्री. धनंजय. तिघेही मिठाई-श्रीफळ-दक्षिणा घेऊन बाहेर पडले. त्र्यंबकेश्वर सोडल्यावर जव्हारच्या घाट रस्त्यावर सीडी लावली. ४५ मिनिटे काचबंद एसी मधे स्तब्ध प्रवास करीत प.पू भक्तराज महाराजांच्या मोरचुंडी ह्या छोटेखानी निवांत शांत पवित्र आश्रमात पोहोचले. महाराजांची गादी आणि शिवालयाचे भावपूर्ण अर्चन करून पादुकांवर सीडी अर्पण केली. याच ठिकाणी, बाबांच्या अस्तित्वाच्या साक्षीने, अज्ञात आणि श्री. धनंजय यांनी कवितांच्या निवडीची पहिली फेरी तीनेक महिन्यापूर्वी पूर्ण केली होती. मोरचुंडीहून परत येतांना त्र्यंबकेश्वरला, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधीवर सीडी नैव्यद्य दक्षिणा अर्पून मंडळी माघारी परतली

किती अमीषे परिसकथेची भुलले मन एकांतक्षणी
बंद पुकारुन वाहुन गेले बांधावरुनी पाणी

कळा पेटल्या विझल्या झाली त्याची एक कहाणी
काळोखाच्या झळा सावल्या मंतरल्या कोणी !!

परिसाला स्पर्श करणार्‍या लोखंडाचं सोनं होते म्हणे. आयुष्यात असे परिस कधी कधी कोणत्या ना कोणत्या वळणावर लाभतात. जाताना हे परिस आपल्या आयुष्याच्या दैनंदिनीतील काही पाने व्यापून जातात. कधी बसून ही जुनी पाने चाळली की पुन्हा त्या कथा जिंवत होऊन डोळ्यांसमोर येतात. मनाचा एखादा हळवा कोपरा त्या आठवणींनी गलबलतो. ‘नाही… कधीच नाही’ हे ठरवलेलं असतं पण मेंदूने सांगितलेली ही सुचना डोळ्यांना कळली तरी वळत नाही. पाणी वाहायचं म्हटलं की वाहतेच. भिंतीवरची एखादी अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेली फ्रेम काढली तरी त्या फ्रेमची चौकट मात्र दृश्य रुपात भिंतीवर तशीच असते. मग ते झाकायला तिथे दुसरी फ्रेम लावणं क्रमप्राप्त होतेच. तो ठसा झाकला गेला तरी पुसला काही जात नाही. कुणीतरी असच त्या ठश्यासारखं ठाण मांडून असतं. मनाच्या एका भिंतीवर.

आठवणी दुखद असो वा सुखद… त्या कळ्यांसारख्या डोकावतात… बहरतात…. उमलतात… मग पुन्हा कोमेजतात. जाता जाता त्यांचा गंध देऊन जातात. बघता-बघता तरळून गेलेल्या क्षणाचीही एक कहाणी असतेच. मग अशा कळ्यांची.. आठवांची कहाणी … आठवांचा भार ओसरतो… मनासोबत डोळे मिटतात. तात्पुरता अंधार झाकोळून टाकत सारं. पण ती झळ सोसवत नाही आणि मन टक्क उघडतं. तेव्हा क्षितिजावर रेंगाळत असलेली आठवण अजूनही असते. तिच्या सोबत असतात तिच्या सावल्या… वेगवेगळ्या… एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या आकाराच्या सावल्या असाव्या तशा… जादुगाराच्या पोतडीत अजब वस्तू एकामागोमाग एक निघाव्या तशा या आठवणींशी निगडीत सावल्यांची मालिका… मंत्रवल्यासारखी… एकीतून दुसरी… दुसरीतून तिसरी..

पश्चिमेचा सांजवारा आणि व्याकुळ पारवा
सावली हरवून गेली पेटवूनी मारवा

पाहुनी अस्वस्थ वेळा स्नेहज्योतीचा दिवा
तापल्या रात्रीत जागा छेडु लागे चांदवा

साजरा आक्रंद वेडा छेद देई अंबरा
संचिते उकलून सारी आळवी अन अंतरा

मावळतीची दिशा अन निराशेचा सूर यांच एक अनामिक नातं आहे. आयुष्य मावळतीला गेलं की मग कधी कधी गेल्या क्षणांचा लेखाजोखा हाती घेतला जातो. काय कमावलं ? काय गमावलं ? यात कमावलेलं असतं त्यापेक्षा गमावलेल्या क्षणांच्या सुया मनाला टोचत राहतात. पारवा म्हणजे इवलसं पाखरू. या अनंताच्या अफाट पसार्‍यातील एक नगण्य अस्तित्व. त्यात त्याची व्याकुळता. नगण्य असलं तरी त्याला अस्तित्व आहे हे त्याच्या दृष्टीने पुरेसं. असा पारवा मावळतीच्या वेळेस… आयुष्य सांजावताना निवांत होतोय तोच आठवणी वार्‍यावर स्वार होऊन त्याच्या दिशेने येतात. एखादी झुळूक सुखावते तर एखादी गारठवते. सुर्य अस्तास जातो आणि सावलीची सोबतही संपुष्टात येते. ‘एकला चालो रे’ हा मानवाचा मुलमंत्र. येताना एकटा आणि जातानाही. संध्याछायेत जाणवतं की आजवर सोबतीस असलेले किती पुढच्या प्रवासाला निघून गेलेत आणि किती फार मागे रेंगाळलेत ते. मग हे एकटेपण छळायला लागतं.

आयुष्याला अर्थ देऊन गेलेला गोतावळा समोर उभा राहतो. डिजीटल कॅमेर्‍यातील एकेक चित्र पाहून, तपासून घ्यावे तसा एकेक प्रसंग अस्वस्थ मन:पटलावर उमटू लागतो. मनाची अस्वस्थता वाढते. रात्र जड होऊ लागते. जगाला शीतलता देणारा आकाशीचा रोजचा चांदवाही मनाला पोळतो.

मनाचा हा आक्रंद झिडकारून टाकता येत नाही. हव्याहव्याश्या वाटणार्‍या गोड गुपितासारखा तो मनासोबत असतो. साजरा वाटणारा आक्रंद… पण कधी तो अशा अस्वस्थ वेळी तीव्रता गाठतो. मनाच्या सगळ्या अज्ञात सीमा ओलांडून जातो. पुन्हा पुन्हा आकाशाकडे झेपावून माघारी फिरणार्‍या पाकोळीसारख्या या आठवणींचा आक्रंद भोवतीच घिरट्या घालतो. मग उमलतात काही नवीन गोष्टी. ज्यांचा कधीच विचार केलेला नसतो. काही सुखावह तर काही वेदनादायक. मग त्यांच्या पारायणात चित्र पुर्ण स्पष्ट होतं. मनातला एक गुंता नकळत सुटतो. त्या गुंत्याचं एक टोक सापडतं आणि गोष्टी उलगडतात.

या सर्व उठाठेवी होत असतांना अज्ञातांच्या पत्नी सौ. माधुरी जपानमधे त्यांच्या मुलीकडे होत्या. हे प्रकरण त्यांच्या न कळत पूर्ण करून दिवाळीच्या पाडव्याला एक सरप्राईज भेट म्हणून द्यावं ह्या विचारांनी कामाच्या गतीने वेग घेतला. गंमत म्हणजे सौं. अज्ञात यांना कविता ह्या विषयात फरसा रस घेत नाही. निदान कवितांच्या संगीतमय रूपाने त्यांच्यात थोडी गोडी निर्माण व्हावी ही अज्ञातांची माफक अपेक्षा.

ओवाळणीची विशेष उत्सुकता ! मोठं स्पेशल पॅकिंग. पॅकिंग वरून साडी पैठणी असल्यासारखं. एकेकाचे गेसवर्क सुरू. वेळ आली. ओवाळणी घातली. पॅकिंग उघडल्यावर निघालेला ‘सीडी’ चा उंदीर !! तसा हलकल्लोळच झाला थोडा. प्लेअरवर लाऊन पाऊण तास ऐकण्याचा कार्यक्रम. पण कुणाची सीडी ?? ………….

अज्ञातांच्या भावंडांना आणि आई वडिलांनाही ते कविता लिहितात हे प्रथमच कळले होते. त्यात शौनक
अभिषेकींनी गाइलेली सीडी !! असा वेगळाच माहोल तयार झाला. मात्र “अज्ञात” नावावर सर्वांनीच आक्षेप घेतला. खुद्द घरच्यांनाच जर कवी अज्ञात असेल तर मग आमच्यासारख्यांच काय ? असो.

तेच गवाक्ष बुलबुलही कक्षेस किनारा नाही पण
मन पराधीन भटके असीम दूरस्थ गातसे कोणी

अक्षय हा प्रवास जीवनभर खेळते पटावरती राणी
हसते रडते कधि तरंगते पापणीत अवघड पाणी

खिडकीत बसून जेव्हा आपण डोकावतो तेव्हा त्या खिडकीची एक ठराविक लांबीरुंदीची चौकट असते. त्या चौकटीतून पाहणारे आपण. आपल्यापण लांबीरुंदी, उंची, वजनाच्या व्याख्या आहेतच की. त्या नियत क्षेत्राच्या बाहेर आपण आपला विचार करू शकत नाही. पण त्याच चौकटीच्या बाहेर जेव्हा नजर जाते तेव्हा समोर असलेल्या किंबहुना पसरलेल्या जगाला सीमा नसल्याचं जाणवतं. नजर दूर क्षितिजापर्यंत जाते. आपल्या लेखी तीच या अवकाशाची, धरेची चौकट. त्याच्यापलिकडे नजर जात नाही. पण मन जाते. त्याला अडवू शकेल असा आहेच कोण ? ते आहे परमेशासारखं निराकार, सर्वव्यापी, सर्वत्र. म्हणुन तर माणसात ईश्वर आहे असं म्हणतात संतज्ञानी. या मनाला मात्र त्या क्षितिजापलिकडचे सूर ऐकू येतात.

मनाचा हा अव्याहत चालणारा प्रवास शरीराचा श्वास चालू आहे तोपर्यंत चालू असतो. याच्या बिंबात कधी आपण हसतो, कधी रडतो. भावनांच्या सरमिसळीचा उगम तो या मनाच्या गाभ्यातूनच आणि त्याचे दृश्य प्रतिनिधित्व असते ते डोळ्यातल्या पाण्यात. आनंद असो वा दु:ख… पापण्या ओलावतातच.

थोडी गझलच्या अंगाने जाणारी असली तरी ही गझल नाहीच. तशी प्रत्येक गझल ही एक कविताच. पंडीतजी सूर छेडतात तेव्हा आभास हा गझलचाच असतो.

या सुप्त ओळखीला कुठलेच नाव नाही
चंद्रास खंत जेंव्हा लाटेस गाव नाही

प्रत्येक नात्याला नाव हवं हा अट्टाहास आपलाच. त्यापलिकडे जाऊन विचार करायचाच नाही. ज्याला नाव देता येत नाही ते नातं अनैतिक का वाटतं याचा उलगडा अजून झालेला नाही. किडलेलं मन जोवर स्फटिकासम नितळ होत नाही तोवर हा वाद चालणारच. पण खरचं कधी विचार केला की वाटतं प्रवासात ऐनवेळी तहान लागल्यावर पाण्याचे घोट देणारा तो आपला कोण ? चालता-चालता आपल्याला ठेच लागली असता डोळ्यात पाणी आणि चेहर्‍यावर दु:ख आणणारी ती अनोळखी आपली कोण ? मनमुराद खळखळून हसताना दूरवर बसलेले कुणी त्या हास्यात नकळत सहभागी होतात ते आपले कोण ? केवळ फोनवर झालेल्या ओळखीचं कधी कधी भेटीत रुपांतर होतही नाही. पण नातं आहेच. मग ते कोणतं ? साधी तोंडओळख असताना तिच्या वेदनांनी जेव्हा मन गलबलतं तेव्हा तिचं आपल्याशी नेमकं नात कोणतं ? अशा कितीतरी ओळखी ज्या फक्त ओळखी न राहता त्या पलिकडे काहीतरी असतात पण काय ? भरतीची लाट चंद्रोदयानंतर उसळते. ओसरते. कोणासाठी ?

उर्दाळल्या क्षणांचा शरघाव खोल देही
हृदयात वेदनेचा सल बोचरा विदेही

क्षण एक पुरेसा असतो घायाळ करण्यासाठी. मग ते शस्त्राने असो वा शब्दाने. काळ प्रत्येक जखमेवर मलम लावतो. तिला ओंजारतो. गोंजारतो. पण सल उरतोच. वण उरतोच. शरीरावरील घाव सर्जरी करून झाकताही येतात. पण ते आहेत हे लक्षात राहतं कारण मनाचे वण तसेच असतात. उघडेबोडके. कायम.

दूरस्थ जो दिलासा कुरवाळतो व्यथा ही
अनिकेत त्या जगाशी नाते असून नाही

प्रश्न म्हटलं की उत्तर आहेच आणि जखम म्हटली की मग औषध आहेच. व्यथेवर दिलासा असतोच. नजरेच्या टप्प्यात असलाच पाहीजे असं नाही. पण व्यथेला हेही पुरेसे की कुठे तरी तिचा दिलासा आहे. तो कोणत्या जगात वावरतोय याचीही कल्पना असतेच असं नाही. पण तो आहेच हा विश्वास मात्र ठाम असतो. विरहात रात्र जागणार्‍या डोळ्यांना दर्शनाची आस असते. ‘येणार’ इतका दिलासा पुरेसा असतो. खात्री असते, पण तरीही विरहाची व्यथा काही संपत नाही. ती असतेच.

माझेच मी गर्‍हाणे सांगू कसे कुणाला
ज्याचा सही सुगावा संवेदनेत वाही

आपल्याच वेदनांचा जगभर ढोल का बडवावा ? ज्याला सांगावं तो काही विवंचनारहीत नाही. मग उगाच दु:खांचा बाजार मांडण्यात काय अर्थ ? वेदना आहे म्हटले की संवेदना आलीच. ‘क्रियेला प्रतिक्रिया’ असावी तसेच. एखाद्या संवेदनशील मनाला या वेदनेची न सांगता जाणीव होईलच.

अस्पर्श जाण ओली वेडावते जिवाला
चुकले कसे म्हणावे; मी संत नाही

नकळत कोणत्या ना कोणत्या क्षणी हातून एक चूक घडते. घडल्या चुकेची जाण छळते. कारण परिणामांना जबाबदार आपण असतो. कधी वाटतं की पुढे व्हावं आणि चूक कबूल करावी. पण त्यासाठी लागणारे धाडस अंगी नसते. आपल्या चुकांची कबूली देऊन त्याची शिक्षा भोगायला तयार होणे हा सामान्य माणसांचा गुणधर्म नव्हे. हे तर संतांचे काम. ते आपणास शक्य तरी कसे व्हावे ?

तसं पहायला गेलो तर यातली प्रत्येक द्विपदी सुटी वाटते. दोन पायर्‍या उतरून पुढे गेलो तर मग यातला संबंध जाणवतो. माळेला गुंफणारा धागा दिसत नाही तसाच हा एक अदृश्य धागा या प्रत्येक द्विपदीतील परस्परासंबंध सांगून ज्ञातो. हा अनुभव न आलेला माणूस विरळाच !

नाशिकच्या मोजक्या जाणकारांना कुठलाही संदर्भ न देता ऐकवून थोडा धीर आल्यावर, श्री. मकरंद हिंगणेसह मंडळी नाशिकच्या आरती डिस्ट्रिब्युटरच्या श्री. रवी बारटक्के यांना भेटली. त्यांना सीडी ऐकवली व त्यांनीच सुचविल्याप्रमाणे ती पुण्याच्या फाउंटन म्युझिक कंपनीचे कांतीभाई ओसवाल यांना ऐकवली. त्यांनाही ती आवडल्याने त्यांनी ती प्रसिद्ध करण्याची तयारी दर्शवली. विनायक रानडेंच्या सहकार्याने नाशिकच्या “विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने” निर्मिती करण्याचं दायित्व स्वीकारलं. काळपरत्वे कंपनीने त्यांच्या आर्टिस्टकडून कव्हर डिझाईन करून पाठविले.

योगायोगाने, अज्ञात त्यांच्या दुसर्‍या मुलीकडे “दुबई फेस्टिवलच्या” निमित्ताने दुबईला असतांना, तिथे ४,५,६, मार्च २०१० ला झालेल्या, “दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलनात” ध्यानी मनी नसतांना, संमेलनाध्यक्ष महाराष्ट्रभूषण कवी मंगेश पाडगांवकर यांच्या शुभहस्ते “पश्चिमेचा सांजवाराचे, सुप्रसिद्ध भवगीत गायक अरूण दाते यांच्या उपस्थितीत आणि दुबई महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्थ आणि माजी अध्यक्ष डॉ. उदयशंकर बोलन, सदस्य श्री. जोशी यांच्या साक्षीने गौरवपूर्ण अनावरण झाले.

येत्या २६, २७, २८ मार्च ला पुण्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनापूर्वी / संमेलनात फौंटन म्युझिक कंपनीच्या स्टॉलवर आणि इतर ठिकाणी सीडी विक्रीस उपलब्ध होईल. त्याआधी नशिकला एखादा प्रेस रिलीज होईल.

आता महफिलीची सांगता….

सरला दरवळ सुकला कातळ
विरली नभात मेघावळ
हसले नितळ टिपुर चांदणे
खोल निळ्या आभाळावर

कांही सूर सुरात मिसळले
कांही हरवलेले गवसले
कांही निसटूनही उमटले
काळजावरती

गंध ओसरलाय. ओलावल्या निसर्गाची ओल सरलीय. आकाश निरभ्र झालय. आतातर रात्रीचा घनाचा पसाराही नाही. जे आहे ते फक्त लुकलुकतं चांदण. मन अगदी निरभ्र झालय.

अशात एक पहाट… दिवाळी पाडव्याची. पंडिता किशोरी आमोणकर यांच्या महफिलीची वेळ. नाशिकच्या नेहरू चौकात श्रोते जागा अडवून, बिलगून बसलेले. समोर रंगमंचावर वाद्ये आणि वादक तयार. पहाटे साडेचरला अपेक्षित असलेली महफिल वाट पाहून वैतागलेल्या श्रोत्यांसमोर सात वाजता सुरु झाली. गायिका तान घ्यायला तयार…. वाद्यांचा मेळ झाला. वादकांनी नुसत्या नजरेच्या इशार्‍यावर त्यांची तयारी दर्शवली आणि गायिका सज्ज झाल्या. ती पहिली तान, पहिली हरकत, पहिली सम…. जीव श्रवणयंत्रात येऊन थबकलेला…. आणि वातावरणात ते अद्भूत स्वर्गीय स्वर…… आणि मग समोरच्या श्रोत्यांबरोबर त्या स्वरांच्या गंगेत न्हात गेला अवघा आसमंत… सजीव… निर्जिव…. आता काही होतं तर फक्त सप्त सूरांची अवर्णनीय बरसात……

किरण चांदणं मधाळलं
मखर स्वरांनी तेजाळलं
खोपा खोपा फांदी फांदी
चिमण पाखरू पान्हाळलं

आकाशात विझत असलेल्या चांदण्यानी त्या स्वरमाधुर्याचा जाता-जाता रसास्वाद घेतला. समोरच्या पिंपळपारावर विसावलेल्या गजाननाचा इवलासा गाभारा अलौकीक स्वरांनी तेजाळला. ती सुरेल तान ऐकताच पिंपळपानाच्या आड असलेल्या घरट्यातून चिवचिवाट करणारी पाखरं आपला चिवचिवाट विसरली.

आत स्वर बाहेर स्वर
अन अभिसरण हे उमाळलं
पानावरच्या दंवात भिजुनी
इंद्रधनूही ओशाळलं

आता स्वर फक्त आसमंतातच नव्हे तर अतर्मनात होते. श्वासातच नव्हे तर नसात होते…. त्यात दौडणार्‍या रक्तात होते…. रोमरोम त्या स्वरांची जादू अनुभवत होता. पानावर थबकेलेल्या दवबिंदूतून परावर्तित होणारा पहिला सुर्यकिरण नेहमीप्रमाणेच सप्तरंगांची उधळण करण्यास निघाला खरा, पण सप्तसुरांच्या वर्षावात चिंब झालेल्या कोणी त्याची दखल घेतलीच नाही. एवढं कारण त्याचा तोरा जिरवायला पुरेसं होतं.

नदीकाठ अन गार वारा
ऊन देखिल शहारलं
चौकामधल्या भिंतीवरती
पिंपळपान तरारलं

गोदावरीच्या पात्रातलं पाणी किनार्‍याजवळ उचंबळायला लागलं. लाटेवर लाटा येऊन थडकत होत्या. अंतरी एकेक तान घेऊन मागे सरत होत्या. अवखळ वारा त्याच्याही नकळत थंडावला. स्वरमोहीनी नखशिखांत पांघरून असलेल्या कुणाला त्यांच्या अस्तित्वाने साधी शिरशिरीही येण्याचा प्रश्न नव्हता. याची जाणिव त्या कोवळ्या उन्हाला न झाली तर नवल ते काय ? स्वरांच्या साक्षात्काराने तेही शहारलं. इतकचं नव्हे तर चौकातल्या जुनाट भिंतीच्या फटीत नुकतच पालवी फुटलेलं पिंपळपानही त्या स्वरमार्दवाने तरारलं. नजर वळवून सुरांच्या स्त्रोताला शोधू लागलं.

स्वर्ग उतरे धरेवरी
जीव भिजला वरचेवरी
गात्र गात्र लाटेवरी
कातर मनही पाणावलं

स्वर्गीय आनंद घेण्यासाठी स्वर्ग पाहण्याची गरज नाही. संगीतात इतकी जादू आहे की ते वाळवंटाचे नंदनवनात रुपांतर करू शकते. परमेश्वरांने म्हणूनच काही गळ्यांमध्ये स्वतःचा निवास स्थापित केलाय. तो तेथूनच सर्वसामान्यांशी संवाद साधतो. ईश्वरप्राप्तीचा आनंद याचि देही याचि डोळा गवसल्यावर अजून या जीवाला काय हवयं ? तृप्त मनाला अजून आस शिल्लक राहणार तरी कसली ? आत्मा परमात्म्यात विलिन झाल्यावर देहांचा अवयवांचा भ्रम नाहीसा होतो. पंचेंद्रियांना पंचमहाभुतांची जवळीक लाभल्यावर ‘मी’पण असं काही उरतच नाही. अशी सर्वोच्च समाधीची अवस्था गाठल्यावर मनाला पाझर तो फुटणारचं.

महफिलीची सांगता अशीच व्हायला हवी होती. कवितेचे गीत होते आणि स्वरलहरीवर स्वार होऊन ते सर्वत्र विहरू लागते. आज अज्ञांतांच्या निव्वळ आठ कविता स्वरबद्ध झाल्यात. येत्या काळात इतरही होतील यात शंका नाही. तेव्हा पुन्हा त्याच गोदावरीच्या तीरावर बसून त्या गीतांचा आस्वाद घेता येईल… येणारा दिवाळी पाडवा नव्या गीतांच्या रोषणाईत उजळून निघेल.

आता कवींच्या शब्दात म्हणायचं तर “सीडीतील सर्वच कवितांना मकरंदने दिलेल्या चाली, मला स्वतःला माझ्या कुवतीप्रमाणे समर्पक वाटल्या, तरीही त्यातल्या ६ व ७ क्रमांकाच्या कवितांच्या ‘चाली, संगीत, गण्याची लय आणि शौनकचं त्याप्रतीचं योगदान’ हे, त्या कविता लिहिल्या गेल्या वेळची ‘प्रेरणा, भावना, मनःस्थिती, वातवरण, अवस्था आणि परिणीती’ यांची शतप्रतिशत किंबहुना त्याही पलिकडची अनुभूती प्रत्येक वेळी देतात असं मला प्रकर्षानं वाटतं. अजून एक महत्वाची बाब म्हणजे संगीतकार मकरंद हिंगणे याने कुठल्याही प्रकरचे मानधन न घेता ह्या कवितांचा विशेष सन्मान केला आहे. पं. शौनक अभिषेकी यांनीही, निव्वळ कवितांचे शब्द-आशय-विषय आणि मकरंदने त्यावर घेतलेली प्रमाणिक मेहनत यांचा आदर करून केवळ खर्चापोटी आवश्यक तेवढेच मानधन स्वीकारले आहे ही नमूद करण्याजोगी बाब आहे. ”

कवितांच्या जन्माबाबत अज्ञांतांचे मनोगत त्यांच्याच भाषेत “खरं तर प.पु. भक्तराज बाबा हयात असतांना, परंतु स्वप्नात, मला म्हणाले “कांही लिहितोस की नाही ?”. मी ‘नाही ‘म्हणालो. म्हणाले, “मग मी सांगतो ते लिही” आणि कुठल्याशा भजनाची ओळ सांगितली. ते उत्तम भजने लिहीत आणि सुरेल गातही असत. ती ओळ लिहिता लिहिता मी त्याला लागून पुढची ओळ गुणगुणलो त्यावर “येतं तर काय लिहायला, लिहीत जा” म्हणाले आणि जाग आली. मी हा आशीर्वाद समजून लिहीत सुटलो. कळत नकळत अज्ञातातून मिळणार्‍या प्रेरणेप्रमाणे. जे उत्तम आहे ते “ह्या प्रेरणेतून” आलेलं आणि जे सपक आहे ते “मी लिहितो ह्या अविर्भावातून गळालेलं” असं मी प्रामाणिकपणे समजतो. म्हणूनही कवी “अज्ञात”!!”

उचंबळ प्रवाहाचा
फड्फड ओल्या पंखांची
भरली ओंजळ मोत्यांची
तरीही खंत तशीच
कांहीतरी उरल्याची

प्रवाहाचा उंची गाठण्याचा प्रयत्न… नव्या पंखात उडण्याची उर्मी….. मोत्यांनी भरलेली रिती ओंजळ तरीही……

डॉ. रेगेंच्या बंगल्यासमोर रिक्षा येऊन थांबली तेव्हा पावसाला नुकतीच सुरूवात झाली होती. अजून म्हणावा असा जोर नव्हता. रिक्षातून उतरतण्यापुर्वीच तिने पन्नासची नोट रिक्षावाल्यासमोर धरली.
 
“तीन रूपये सुट्टे द्या मॅडम” रिक्षावाल्याची नेहमीची सुट्ट्यांची रड. तिला माहीत होती बहूतेक. तिने ताबडतोब तीन रूपये त्याच्या हातावर टेकवले. उरलेले सुट्टे घेऊन, आधी रिक्षातून मान बाहेर काढून, तिने बरसणार्‍या सरींचा अंदाज घेतला व ती रिक्षातून उतरली. डाव्या हातातला सेल जीन्सच्या खिशात कोंबून, उजव्या हातातली काळी हॅंडबॅग डोक्यावर धरून ती तुरतुरत बंगल्याकडे वळली.

बंगला छोटेखानी होता. ’गेल्या दिवाळीलाच रंग केला असावा’ बंगल्याकडे पहाता क्षणीच तिच्या मनात आलेला विचार. डाव्या हाताला काळ्या ग्रेनाईट मध्ये कोरलेली “लतिका” ही अक्षरे नीट उठून दिसत होती. ’बहूधा नवीन बसवली असावी’ पुन्हा विचार. गेटपासून बंगल्याचे मुख्य द्वार साधारण पंचवीस पावलांवर होते. विटा व टाईल्सच्या तुकड्यांचा सुरेख वापर करून, गेटपासून बंगल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत सुबक वाट बनवली होती. दोन्ही बाजूस नीटनेटके बागकाम फुलून दिसत होते. लालबुंद टपोर्‍या गुलाबाला तोडण्याचा मोह आवरत, ती डाव्या हाताला बंगल्याच्या मुख्य दाराकडे वळली. उजव्या हाताच्या पार्कींगला सिल्वर स्विफ्ट उभी होती. एव्हाना पावसाने जोर धरला आणि ती दरवाज्याकडे धावली.

’लाकूड सागवानी दिसतयं. नक्षीकाम ए-वन केलयं’ बेल वाजवण्यापुर्वी तिने दरवाज्याचा धावता आढावा घेतला. बेल वाजवल्यावर तिने हातातली ओली हॅंडबॅग झटकायला सुरूवात केली. मागोमाग आपले बॉब केस आणि टॉप. दरवाजा उघडला गेला. समोर एक पांढर्‍या शुभ्र कपड्यातला म्हातारा उभा होता. तो नोकर असावा हे ताडलं तिने. पण त्याच्या त्या शुभ्र कपड्यांचे मात्र आश्चर्य वाटले तिला. ’नोकरांचे कपडे सहसा इतके स्वच्छ नसतात’ मनात डोकावलेला नवा संशयी विचार.
“डॉ. रेगे ?” तिचा चौकशीवजा प्रश्न.
“या, आत या” निर्विकारपणे त्याने तिला घरात घेतलं.
“या, बसा.” त्याच्या मागोमाग ती आत शिरताच, त्याने एकीकडे इशारा केला व तिने त्या दिशेला पाहीले. एक पायरी खाली उतरून बैठकीसाठी केलेली सोफ्यांची गोलाकार रचना तिच्या दृष्टीस पडली.
“थॅंक्स.” ती बैठकीकडे वळली. म्हातारा तोवर समोरच्या दरवाज्याने आत नाहीसा झाला व जवळपास कोणी नाही हे पाहून, समोरच्या टिपॉयवर आपली हॅंडबॅग टाकून, ती निवांतपणे सोफ्यात पसरली. तेवढ्यात तिचं लक्ष समोरच्या कोपर्‍यात गेलं. एक पाठमोरी व्यक्ती फोन घेऊन होती. ती पटकन स्वत:ला सावरून बसली. त्या व्यक्तीच्या डाव्या हातात कोट होता आणि डावा खांदा व डावा कान यांच्यामध्ये त्याने फोन धरून उजव्या हाताने ती व्यक्ती मोबाईलवर काहीतरी टाईप करत होती. ’हे डॉक्टर रेगे असावेत.’ सहज केलेला तर्क. त्या वक्तीवरील नजर न हलवता तिने चाचपडत आपली बॅग उघडून त्यातला नॅपकीन काढला. त्याच वेळेस समोरच्या दरवाज्यातून म्हातारा ट्रॅमध्ये पाण्याचे ग्लास घेऊन आला. तो तिच्या जवळ पोहोचेपर्यंत तिने बॅग बंद केली. नॅपकीनने आपल्या चेहर्‍यावरचे पावसाचे तुषार ती टिपू लागली. स्वत:चा कार्यक्रम आटोपून जेव्हा तिने पाहीलं, हातातला ट्रे टिपॉयवर ठेवून म्हातारा समोरच उभा होता. तिच्या डोळ्यातले प्रश्नचिन्ह पाहताच तो बोलला,”चहा की कॉफी?”
“अं…. काही चालेल.” तिने मान डोलावत सांगितलं. तो वळला. “एक मिनिट…” तो पुन्हा तिच्याकडे वळला. “कॉफीच आणा.” म्हातारा थांबला. ती अजून काही बोलेल म्हणून.
“थॅंक्स.” ती किंचीत ओशाळून हसली. तो दरवाज्याकडे वळला. तिचे लक्ष सोफ्याच्या पायाशेजारी ठेवलेल्या काळ्या हॅन्डबॅगेकडे गेलं. टिपॉयवरील तिच्या हॅंडबॅगेत व त्या हॅंडबॅगेत कमालीचं साम्य होतं. तिने खिडकीबाहेर नजर टाकली. पावसाचा जोर वाढू लागला होता. तिने आपली नजर फोनवर बोलणार्‍या व्यकीकडे वळवली. त्याने कानाचा रिसीव्हर खाली ठेवला. हातातला मोबाईल शर्टाच्या खिशात टाकून ती व्यक्ती वळली. तिला पाहताच  क्षणभर थबकली. मोकळे बॉब केस, लंबगोल चेहरा, गव्हाळ वर्ण, डार्क ब्लु जीन्सवर खूलून दिसणारा आकाशी टॉप. क्षणभरात पाहता आलं तेवढं पाहून तो सदगृहस्थ बैठकीच्या दिशेने चालू लागला. तिनेही त्याला न्याहाळायला सुरूवात केली. चाळीशीच्या आतच असेल. जवळ जवळ पावणेसहा फुट उंची, गोरा रंग. विस्कटलेले केस, धारदार नाक, सोनेरी काड्यांच्या चष्म्याआड असलेले विचारी डोळे, ओठांवर कोरलेली मिशी, हल्की दाढी, डाव्या हातात काळा कोट, पांढरा शर्ट, काळी पॅंट, पायात काळेच सॉक्स, एका बाजूस किंचीत झूकून चालणे, तिने तो तिच्या जवळ पोहोचेपर्यंत त्याला नीट न्याहाळलं. त्याचवेळेस तोही आपले ’न्याहाळणे’ न्याहाळातोय हे लक्षात येताच ती किंचीत चपापली. ती उठून उभी राहीली. हातातला नॅपकीन तिने बॅगेवर टाकला.
“नमस्कार डॉक्टरसाहेब.” तिने हात जोडले.
“नमस्कार.” कोट सोफ्यावर टाकत त्यांनीही हात जोडले. “बसा.” ती बसली. तेही तिच्यासमोरच टिपॉयच्या पलिकडे बसले.
“मी सुहास. सुहास साटम.” तिने आपली ओळख सांगितली.
“सुहास साटम ?” त्यांनी आठवण्याचा पुर्ण प्रयत्न केला.
“काल मी फोन केला होता.” तिने त्यांना एक क्लु दिला. “सकाळी साडेदहाला.” दुसरा क्लू. “मुलाखतीसाठी.” तिसरा क्लू.
“मुलाखत ? ” ते अजूनही तिच्याबाबत अज्ञातवासात.
“आमच्या पाक्षिकासाठी.” तिने आता शेवटचा क्लू दिला.
“नाव काय म्हणालात ? ” त्यांनी पुढचा प्रश्न टाकला. आता ती जराशी वैतागलेलीच. ’स्वत:हून वेळ देऊन हा माणूस चोविस तासात विसरतो म्हणजे हे फारचं होतयं.’ तिला त्यांचा हा विसरभोळेपणा बिल्कूल आवडला नव्हता. एखादा डॉक्टर एवढा विसरभोळा असेल तर कसं चालेल ?
“सुहास सा…..”
“तुमच्या पाक्षिकाचे ?” त्यांनी उजवा हात वर करून तिला थांबवत विचारले.
“शोध.” तिने बॅग उघडून जरा रागातच नॅपकीन आत टाकला. अचानक ट्युब पेटून लख्ख उजेड व्हावा तशी ती चमकली.
“तुम्ही डॉ. रेगेच आहात ना ? ”
“नाही.” तो सदगृहस्थ शांतपणे मागे रेलला.
“व्हॉट ? ” जवळ-जवळ ती ओरडलीच त्यांच्यावर. तो गृहस्थ जरा दचकलाच.”तुम्हाला सांगता येत नाही की तुम्ही डॉ. रेगे नाहीत म्हणून.”
“कमाल करताय. मी डॉ. रेगे नसताना पुन्हा मी डॉ. रेगे नाही हे कसं सांगायचं ? सांगायचचं झाल तर मी माझं नाव सांगेन. शिवाय तुम्ही मी कोण हे न विचारता सरळ सुरूवात केलीत.” त्या गृहस्थाच्या स्वरात आता मिश्किलपणा होता.
” हे बघा, तुम्ही ’डॉक्टरसाहेब’ या माझ्या हाकेला प्रतिसाद दिलात त्यामुळे  मला वाटलं की….” त्यांच्या चेहऱ्यावरच्या मिश्किलीकडे पहात तिने वाक्य अर्धवट सोडलं.
“आता मी डॉ. असल्याने असल्या हाकांना ओ द्यायची सवय आहे मला.” तिने अर्धवट सोडलेल्या वाक्यातील अव्यक्त प्रश्नाला डॉक्टरांनी उत्तर दिले.
“मग डॉक्टर रेगे आत आहेत का ?” तिला फक्त डॉक्टर रेगे ठरल्याप्रमाणे भेटणार की नाही यातच रस होता.
“सध्या तरी नाहीत. मीही त्यांचीच वाट पहातोय. इतक्यात यायला हवेत, असं मगाशी त्यांचा नोकर म्हणाला”. डॉक्टरांनी त्यांच्याकडे असलेली माहीती पुरवली. त्याच वेळेस फोन वाजला. दोघांनी आधी फोनकडे व मग आत पाहीलं. फोन वाजत होता आणि म्हाताऱ्याचा काही पत्ताच नव्हता. शेवटी डॉक्टर फोन घेण्यास उठले, त्याच वेळेस म्हातारा तेथे हात पुसत पोहोचला. त्याला पहाताच ते परत बसले. पण म्हातारा फोनजवळ पोहोचण्याच्या आतच फोन बंद झाला. त्यानंतर म्हातारा जे काही पुटपुटला जे त्या दोघांना नीट ऐकू गेलं नाही. म्हातारा पुन्हा आत जायला वळला. चार पावलं चालला तोच फोन पुन्हा वाजला. त्याने झपाट्याने वळून फोन उचलला.
“हॅलो……. हो….. नाहीत, साहेब घरी नाहीत……………. माहीत नाही……………….. मी इथला नोकर बोलतोय……….. म्हादेव……….कोणाचा फोन होता म्हणून सांगू ?………… आग्रे…… आंग्रे…….. बरं सांगतो.” त्याने फोन ठेवला व त्यांच्याकडे एक नजर टाकून तो पुन्हा आत नाहीसा झाला.
“तुमच्याकडे डॉक्टर रेगेंचा सेल नंबर आहे का ?” तिने डॉक्टरांना विचारलं.
“आहे. पण सध्यातरी नोट रिचेबल आहेत ते. तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर हा घ्या.” बोलता-बोलता खिशातला सेल काढून त्यांनी स्क्रीनवर असलेला शेवटचा डायल केलेला सेल नंबर तिला दाखवला. स्वत:च्या खिशातला सेल ती काढेपर्यंत त्यांनी नंबर डायल केला व स्पीकर ऑन केला. नंबर ’स्विच्ड ऑफ’ असल्याचे पलिकडील मंजुळ आवाजाने सांगितलं आणि त्यांनी फोन डिसकनेक्ट केला. ती वैतागली. ’वाट बघणे’ हा प्रकार तिला आवडत नाही हे तिच्या एकंदर वैतागण्यावरून त्यांच्या लक्षात आलं. थोडा वेळ शांतता पसरली. ती बसल्या जागेवरून घर न्याहाळू लागली. तिची नजर सगळीकडे फिरून त्यांच्याकडे वळली.
“तुम्ही रिपोर्टर आहात ?” तिने त्यांच्याकडे पाहताच त्यांनी सरळ तिची चौकशीच सुरू केली.
“क्राईम रिपोर्टर” तिने अभिमानाने सांगितलं. स्वत:बद्दलचा व स्वत:च्या प्रोफेशनबद्दलचा तिचा विश्वास तिच्या स्वरात ठाम होता.
“इंटरेस्टींग” त्यांचा डावा हात सोफ्याच्या काठावर विसावला.
“तुम्ही ’शोध’ वाचलाय कधी ?” तिनेही उलटतपासणी सुरू केली.
“वाचलाय. जमल्यास अधून मधून वाचतो. मला क्राईम स्टोरीज वाचायला आवडतं.” त्यांच्या या होकारावर ती सुखावली. पण दुसर्‍याच क्षणी तिच्या पुढच्या प्रश्नावर तिने त्यांची विकेट काढली. “म्हणजे क्राईम हा विषय तुमच्या दॄष्टीकोनातून निव्वळ विरंगुळा आहे तर.” डॉक्टर गांगरले. पण स्वत:ला सावरून ते मंदसे हसले.
“नाही. विरंगुळा नाही. मेडीकल प्रोफेशनमध्ये या विषयाला एवढं सहज घेता येत नाही.” मघासचा म्हातारा आता वाफाळलेली कॉफी घेऊन आला. दोघेही गप्प झाले. त्याने ट्रे समोर ठेवला. पाण्याचे ग्लास दुसर्‍या ट्रेमध्ये ठेवले.
“थॅंक्स.” दोघेही एकाचवेळेस म्हणाले. म्हातारा पाण्याच्या ग्लासांचा ट्रे घेऊन आत जायला वळला.
“घ्या.” त्यांनी कप उचलून समोर केला. तिने नजरेनेच ’थॅंक्स’ म्हणत कप घेतला. दुसरा कप उचलून त्यांनी त्या वाफाळलेला अर्काचा घोट घेतला. आत जाता जाता म्हातारा थबकला व त्याने एकदा मागे वळून त्यांच्याकडे पाहीलं व तो आत शिरला.
“माझा या ’क्रिमिनोलॉजी’ विषयावर सध्या अभ्यास चालू आहे. डॉ. रेगेंनी याच संदर्भात मला येथे बोलावलय.” डॉक्टरांनी तिच्या विषयातील आपले ज्ञान प्रकट करायला सुरूवात केली.
“म्हणजे नेमकं काय? ” ती सरसावून  बसली.
“वेगवेगळ्या क्राईम्सच्या वेळेस असणारी क्रिमिनलची मनस्थिती व त्याला तो क्राईम करण्यास भाग पाडणारे फॅक्टर, यातला त्याचा मनाचा सहभाग वगैरे…वगैरे..” त्याने थोडेसे स्पष्टीकरण दिले.
“डॉ. रेगेही ह्याच विषयावर काम करताहेत का ?” तिने चौकशी चालू ठेवली.
“नाही. सिरियल किलर्स’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे आणि संपुर्णपणे बुडून ते असल्या अनेक प्रकरणांचा अभ्यास करत आहेत. पंधरा दिवसापुर्वीच त्यांची नि माझी डॉ. दिवेकराच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशी ओळख झाली. त्यावेळेस त्यांनी मला याबद्दल माहीती दिली. आज भेटायचे ठरलेले. पण महाशय स्वत:च गायब.” बोलता-बोलता त्यांनी नजर आतल्या दाराला वळवली व तिच्या दिशेला पुढे सरकले. काहीतरी गॉसिप ऐकायला मिळेल या आशेने ती पुढे सरली. आवाजाची पट्टी खाली उतरवत ते तिच्याकडे वळले. ” पहिल्याच भेटीत माणूस विक्षिप्त वाटला मला. पण दिवेकर म्हणाले, ते नंबर वन आहेत. एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की मग बाकी सगळं विसरतात. त्यांच्या अशा वागण्यानेच त्यांची बायको त्यांना सोडून गेली. पण त्यांना काहीच फरक पडला नाही.”
“खरचं ? मला कल्पना नव्हती या गोष्टींची. तशी त्यांची नि माझी आज पहिल्यांदाच भेट होणार आहे. फोनवर बोलताना तरी ते व्यवस्थित वाटले.” बोलता-बोलता तिने आतला कानोसा घेतला. ” बाय द वे, तुमचा फक्त अभ्यासच आहे की आयुष्यात कधी तुम्ही एखाद्या क्राईममध्ये इनवॉल्वही झाला आहात …. विटनेस म्हणून किंवा विक्टीम म्हणून किंवा …” कसायाला बकरा मिळाल्यावर त्याने सरळ घाव घालावा तसा तिला तिच्या विषयात रस घेणारा आयता सापडलेला. तिने सरळ घाव घालून कॉफीच्या एका दिर्घ सीप पोटात ढकलला.
“…स्वत: क्रिमीनल म्हणून. असचं ना ?” त्यांनी चष्मा काढत हसून विचारलं.
“हो” तिला तिच्या त्या थेट प्रश्नात काहीच वावगं वाटलं नाही. अनोळखी लोकांशी थेट बोलण्यात वाटणारी भीड तिच्या प्रोफेशनमुळे केव्हाच चेपली होती.
“सुदैवाने वा दुर्दैवाने, अजूनतरी नाही. पण याबाबतीतला अभ्यास पुर्ण करायचा असेल तर काही दिवस एखाद्या क्रिमिनलबरोबर काढायला हवेत. काठावर राहून कसं कळणार की सागराच्या पोटात काय आहे ? ” त्यांनी खिशातील रूमाल काढून चष्मा पुसत तिला उत्तर दिलं. 
“तेही खरच.” तिला मुद्दा पटला त्यांचा.
“पण क्राईम रिपोर्टरने संशयी असायलाच हवं हा बेसिक कन्सेप्ट आहे का तुमच्या प्रोफेशनचा ?” त्यांच्या चेहर्‍यावर स्मित कायम होतं. त्यावर त्यांनी नीट पुसलेला चष्मा चढवला.
“होय. निदान माझातरी. मला प्रत्येक जण संशयित वाटतो. प्रत्येक जण आयुष्यात कोणता ना कोणता गुन्हा करत असतो. छोटा वा मोठा. ज्याचा गुन्हा उघडकीस येतो तोच केवळ गुन्हेगार आणि जे गुन्हे अजून अंधाराच्या तळघरात दडलेत, त्यांना प्रकाशात आणण्याची जबाबदारी माझी. आय मीन आमच्यासारख्या रिपोर्टर्सची.” तिने त्यांच्या नजरेला नजर भिडवत मुद्दा मांडला.
“१०० % क्राईम रिपोर्टर. पण हे असं धोकादायक क्षेत्र…” ते बोलता-बोलता थांबले.
“एक मुलगी असून का निवडलं ? असचं ना. ” नकळत त्यांची मान डोलली. कप टिपॉयवर ठेवून ती तोवर उभी राहीली. “मला चारचौघीसारखं ऑफीस आणि घर अशा ९ ते ५ च्या फेर्‍यात मिळमिळीत आयुष्य जगण्यात कधीच रस नव्हता.” बोलता-बोलता ती खिडकीकडे वळली. ” आय हेट रूटीन. या क्षेत्रात तसं नाही. नेहमी काहीतरी अनपेक्षित. नवा गुंता. नवा शोध.” तिची नजर खिडकीबाहेरच्या पावसात अडकलेली. ती त्यांच्याकडे वळली.
“आता हेच पहा. मी इथे डॉ. रेगेंना भॆटायला आलेली. त्यांचा अजून पत्ताच नाही. मी तुम्हाला डॉ. रेगे समजून तुमच्याशी बोलले. आता हे कळलय की तुम्ही डॉ. रेगे नाहीत. मग प्रश्न हा की तुम्ही कोण ? माझी इतकी चौकशी का करताय ?” तिच्या संशयाला सुरूवात झाली.
“सहज. वेळ जावा म्हणून गप्पा मारतोय. टाईमपाससाठी बाहेर जाऊ शकत नाही. पाऊस पडतोय. दुसर्‍याच्या घरात त्यांच्या परवानगीशिवाय मी टि.व्ही. किंवा प्लेयर लावू शकत  नाही. इथे वाचण्यासाठी एक मासिकही वा वर्तमानपत्रही नाही. शिवाय एक चालती बोलती व्यक्ती समोर असताना मुग गिळून गप्प बसण्यापेक्षा गप्पा मारणे हा एकच उत्तम मार्ग आहे. तुमच्या संशयी मनाला माझी ही कारणे पटली असतील असं मला वाटतय.” तिच्या नकळत तिच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली. त्याचवेळेस तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने उठून खिशातला मोबाईल काढला व ऑन केला.
“यस सर…… यस सर……. मी डॉ. रेगेंच्या घरी आहे……..नाही. ते इथे नाहीत…. नाही. त्यांची भेट झाली की मी सरळ तिथेच येते. ओके.” सेल ऑफ करून तिने बॅगेमध्ये टाकला. चाहूल लागताच त्यांनी बोलण्यासाठी उघडलेले तोंड बंद केले. म्हातार्‍याला पहाताच त्यांनी कपातील कॉफी संपवली. दोघांकडे दृष्टीक्षेप टाकून म्हातारा ट्रे घेऊन गेला. त्याच्या पावलांचा आवाज दुरवर जाताच ते तिच्याकडे वळले.
“तुमची हरकत नसेल तर एखादा प्रश्न विचारू ?” त्यांनी परवानगी मागितली. तिने मान डोलावली.
“डॉ. रेगेंनी असं काय केलयं की क्राईम रिपोर्टर त्यांच्या घरात पोहोचले ?” मनात घुटमळणारा प्रश्न विचारून ते मोकळे झाले.
“वेल, डॉ. रेगेंनी काही केलेले नाही. ते एक मानसोपचार तज्ञ आहेत आणि म्हणूनच त्यांची भेट घ्यायची आहे.” तिने स्पष्टीकरण दिले.
“तुम्ही त्यांच्या घरी आलात म्हणजे प्रॉब्लेम तुमचा स्वत:चा नसावा. काहीतरी विशेष बाब असेल.” त्यांनी संभाषण पुढे रेटलं.
“प्रॉब्लेम आहे. पण तो वेगळा आहे. सध्या जे चाललयं त्या बाबतीत.” ती पुन्हा सोफ्यावर विसावली.
“पण त्याचा डॉ. रेगेंशी काय संबध ?” त्यांना नसत्या तर्क वितर्कात न पडता तिच्याकडून अचूक उत्तर हवं होतं.
“वेल, असेलही… नसेलही. पण यावर मी एक स्पेशल रिपोर्ट बनवतेय आणि ही मुलाखत त्याचा एक भाग असणार आहे.” तिने एक हल्की झलक दाखवली.
“एक मिनिट, शहरात जे घडतयं, त्याबद्दल कोणतीही माहीती उपलब्ध नाही. ज्या आहेत त्या केवळ अफवा आहेत. तुम्ही त्याच छापणार काय ?” ते आता जास्तच तिरकस झाले.
“व्हॉट नॉनसेन्स ? मी अफवा छापते असं म्हणायचयं तुम्हाला ? गेले तीन आठवडे या रिपोर्टसाठी मी जीवाचं रान केलयं. शहरातील सगळे तज्ञ डॉक्टर्स, पोलिस अधिकारी व विक्टिमसचे रिलेटिव्हज या सगळ्यांना भेटून मी हा रिपोर्ट बनवतेय आणि माझा हा रिपोर्ट सगळ्यांना नक्कीच हादरवेल.” ती उफाळून बोलली.
 तेवढ्यात डोर बेल वाजली. दोघांची नजर आधी मुख्य दाराकडे व मग आतल्या दाराकडे वळली. म्हातारा बाहेर आला. त्याने जाऊन दरवाजा उघडला. दारात एक तरूण उभा होता. डोक्यावर हॅट, पायघोळ रेनकोट, पायात गमबूट आणि डाव्या हातात मेडीकल एजंट वापरतात तशी बॅग. रेनकोटची चैन थोडी खाली खेचून त्या तरूणाने शर्टाच्या खिशातले कार्ड काढून दिले. म्हातार्‍याने कार्ड पाहून त्याला आत येण्याचा इशारा केला आणि त्याच वेळेस त्याच्या एकंदरीत अवताराकडे नजरही टाकली. त्या तरूणाने आपली हॅट, कोट बाहेरच्या खुंटीवर अडकवले. गमबुटांसोबत आपले ओले मोजेही बाहेर ठेवले. पाय नीट पायपोसावर पुसून त्याने म्हातार्‍याच्या चेहर्‍याकडे पाहील. त्याच्या चेहर्‍यावर समाधान दिसताच त्याने पाऊल पुढे टाकलं.
“बसा इथे.” म्हातार्‍याच्या खुणेनुसार तो बैठकीकडे वळला व एक हुंकार देऊन बॅग स्वत:च्या पायाजवळच ठेवून किंचीत संकोचून बसला. उभट चेहरा, उलटे फिरवलेले तेलकट केस, किरमिजी रंगाचा चौकडीचा शर्ट, तपकीरी रंगाची पँट व चेहर्‍यावर किराणा माल विक्रेत्याचे भाव. ते दोघेही त्याचा हा सगळा कार्यक्रम पहात होतेच. ते दोघे पहात आहेत हे लक्षात येताच तो किंचीत हसला. नाईलाजाने त्यांनीही हसून प्रत्युत्तर दिले. त्याने बॅग उघडली व त्यातील एक पुस्तक काढले. बॅग बंद करून एक चोरटी नजर त्याने त्या दोघांकडे टाकली आणि पुस्तकात नाक खुपसले. थोड्या वेळासाठी शांतता पसरली. त्या आगंतूकाकडे एक नजर टाकून डॉक्टरांनी तिच्याकडे पुन्हा मोर्चा वळवला.
“तुम्ही रिपोर्टबद्दल सांगत होता.” पुन्हा त्यांनी आधीच्या विषयाला हात घातला.
“वेल, माझा हा रिपोर्ट ओलमोस्ट रेडी आहे. फक्त डॉ. रेगेंची मुलाखत त्यात ऍड केली की झालं.” आगंतूकाकडे वळणार्‍या आपल्या नजरेला ती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत बोलली.
“एक्स्क्युज मी, डॉ. रेगे आहेत ना आत ?” आगंतूक मध्येच बोलला.
“नाही. बाहेर गेलेत.” डॉ. त्याच्या दिशेला वळले.
“येतील ना परत ?” आगंतुकाचा पुढचा प्रश्न.
“त्यांचेच घर आहे, तेव्हा येतीलच परत.” डॉक्टरांनी जरा खोचकपणे उत्तर दिले.
“तसं नाही. म्हणजे आता येणार आहेत की उशीर होईल ? ” तो ओशाळून बोलला.
“कल्पना नाही. पण येतील कोणत्याही क्षणी.” डॉक्टरांनी त्याला दिलासा दिला.
“ओ.के. थॅंक्स.” त्याने पुन्हा पुस्तकाकडे नजर वळवली.
“बाय द वे मिस. साटम, या रिपोर्टमध्ये नेमकं काय असणार आहे ?” डॉ. पुन्हा संभाषणाची गाडी ट्रॅकवर आणण्याच्या नादात.
“मला वाटत मी विनाकारण तुम्हाला प्रमाणाबाहेर माहीती देतेय.” तिचा आवाज किंचीत रूड झाला.
“पण यात तुमचं नुकसान अजिबात नाही. कदाचित थोडीफार माहीती मीही देऊ शकेन. शिवाय या रिपोर्टमध्ये काही त्रुटी असतील तर त्याही जाणवतील. बाकी सांगणं, न सांगणं ही तुमची इच्छा.” डॉ. थोड्या समजावणीच्या सुरात बोलले.
“ठिक आहे.” क्षणभर विचार करून ती बोलली. “आतापर्यंत जेवढे खून झालेत त्या सगळ्यांची माहीती मी गोळा केली आहे. अगदी पहील्या खुनापासून परवा झालेल्या खुनापर्यंत. त्यासंदर्भात मी अनेक जणांच्या ज्या मुलाखती घेतल्या आहेत, त्या सगळ्या माहीतीचा बारकाईने अभ्यास करून काही तर्क मांडले आहेत.”
“तर्क ? फक्त तर्क ? ते चुकीचेही असू शकतात ?” त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
“असतीलही. उद्या जेव्हा या खुन्याला अटक होईल तेव्हा सगळेच त्याच्याबाबतीत लिहीतील. पण मी सर्वांच्या आधी लिहीणार. मी माझ्या अभ्यासातून त्या खुन्याची माहीती व खुनांमागची पार्श्वभुमी मांडणार. पाहुया माझा तर्क कुठवर पोहोचतो ते. मलाही कळेल मी चांगली क्राईम रिपोर्टर होऊ शकते की नाही ?” तिने तिच्या भुमिकेचे समर्थन केले.
“नॉट अ बॅड आयडिया.” त्यांनी तिच्या कल्पनेला दाद दिली. म्हातारा ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास घेऊन आला.
“सर्वात आधी मुद्दा हा की तो कसा आहे ?” तिने तर्कांना सुरूवात केली.
“ती का नाही ? तो कशावरून ?” त्यांनी पुन्हा खोडा घातला. म्हातार्‍याने ट्रे आगंतुकाच्या समोर ठेवला.
“ते नंतर कळेलच.” म्हातार्‍याला पाहून ती दोन क्षण थांबली.
“तुम्ही चहा घेणार का कॉफी ?” म्हातार्‍याने आगंतुकाला विचारले.
“नको. काही नको. थॅक्स.” पाण्याचे दोन घोट घेत आगंतुकाने नकार दिला. म्हातारा आता दोघांकडे वळला.
“तुमच्यासाठी काही ?”
“नो थँक्स.” दोघांनी नकार दिला. म्हातारा ट्रे घेऊन निघाला.
“टिक आहे. पुढे ?”म्हातार्‍याकडे एक नजर टाकून डॉक्टर तिच्याकडे वळले.
“वयाने तो ३० ते ४० च्या दरम्यान असावा कारण तो चपळ आहे. सगळे खून निर्जन स्थानी झालेत व तिथून तो कोणाच्याही दृष्टीस न पडता  व कोणाताही पुरावा मागे न सोडता पळून जाण्यात नेहमीच यशस्वी ठरलाय.” एक नजर दाराजवळ थबकलेल्या म्हातार्‍याकडे टाकून तिने पहिल्या तर्कापासून सुरूवात केली.
“राईट. मला वाटत, एखादा जास्त वयाचा सशक्त माणुसही हे करू शकतो. ज्याने स्वत:ला मेन्टेन केलं असेल असा.” डॉक्टरांच स्वत:च्या पुरवणीसकट दाराआड दिसेनाशा होणार्‍या म्हातार्‍याकडे पहात अनुमोदन.
“शक्य आहे. दुसरा तर्क असा की तो सशक्त आहे कारण प्रत्येक खून हा गळा दाबून करण्यात आला आहे.” तिने पुढचा तर्क मांडला.
” ऍग्रीड. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मनोरुग्ण हे जेव्हा हल्ला करतात तेव्हा त्यांना कधी कधी चार माणसंही आवरू शकत नाही. भले मग त्यांची प्रकृती तोळामासा का असेना. खुनी जर मनोरुग्ण नाही असं गृहीत धरलं तर मग तुमचा तर्क रास्त आहे.” पुन्हा तिला अनुमोदन देताना डॉक्टरांनी पुरवणी जोडली. मान डोलावत तिने पुढचा तर्क मांडला.
“त्याची उंची साडेपाच ते सहा फुटांच्या दरम्यान असावी. कारण याच उंचीच्या मयतांच्या गळा आवळण्याच्या खुणा सरळ आहेत व यापेक्षा कमी उंची असणाऱ्या मयतांच्या गळ्यावरच्या खुणा मानेच्या मागच्या बाजूस वरच्या दिशेला गेल्या आहेत, या अशा..” तिने चक्क दोन्ही हात स्वत:च्या गळ्याभोवती दाबून प्रात्यक्षिक दाखवलं. आगंतूकही पुस्तक वाचायचे विसरून तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला. तिनेही डॉक्टरांच्या अनुमोदनाची वाट न पहाता पुढे सुरूवात केली.
“तो नुसताच तल्लख बुद्धीचा नसून सुशिक्षितही आहे. त्याने ज्या सहजपणे आपल्या बळींना निर्जन स्थळी बोलावून गाठलय, त्यावरून एक गोष्ट जाणवते की हे त्याने त्यांच्या संभाषण चातुर्यानेच केलय. एखादा अशिक्षित माणूस हे करणे शक्य नाही कारण सगळे मयत हे डॉ. होते आणि मानसोपचार तज्ञदेखील. या ना त्या कारणाने या खुन्याचा मेडीकल प्रोफेशनशी संबध असावा व यामुळे त्याच्या सुशिक्षित असण्याच्या तर्काला पुर्ण वाव आहे. तो एखादा पेशंट असू शकतो, एखादा वॉर्डबॉय वा एखादा …” ती तिच्या तर्कात हरवून गेलेली.
“डॉक्टर ?” आगंतुक बोलला.
“यस. एखादा डॉक्टर.” तिने ताबडतोब त्याला अनुमोदन दिले.
“माझ्यासारखा….. ” डॉक्टरांच्या या बोलण्यावर ती दचकली आणि आगंतूकही. “कदाचित डॉ. रेगेंसारखा…… नाही.. रेगे नाही. ते ४५ च्या जवळपास आहेत. मग मीच.” डॉक्टर पुढे बोलले.
“तुम्ही काय बोलता आहात ?” तिने स्वत:ला सावरून विचारलं.
“तुमच्या तर्काची कसोटी चेक करतोय. मी बसतोय या वर्णनात.” स्वत:शीच बोलावं तसे ते बोलले.
“तुम्ही खरचं डॉ. आहात ?” तिच्या स्वरातला अविश्वास जाणवला त्यांना.
“एक मिनिट.” त्यांनी तिला थांबण्याचा निर्देश करत खिशातून विजिटींग कार्ड काढले. “हे घ्या.”
“निशिकांत सरदेसाई. सायकॅट्रिस्ट.” तिने कार्ड वाचले.” तुम्ही सायकॅट्रिस्ट आहात ?” पुन्हा तोच अविश्वास.
“कार्डावर तेच लिहीलय.” त्यांच्या स्वरात मिश्किलपणा होता.
“हे कार्ड खोटे आहे.” ती ठामपणे बोलली.
“म्हणजे हे डॉक्टर नाहीत ?” आगंतुकाने मध्येच प्रश्न टाकला.
“शंभर टक्के, या शहरातल्या सगळ्या सायकॅट्रिस्टची माझ्याकडे लिस्ट आहे आणि त्यात या नावाची नोंद नाही.” तिच्या स्वरातला ठामपणाने आगंतूक शहारला.
“असणार ही नाही. कारण मला या शहरात येऊन फक्त तीन महीनेच झालेत.” डॉक्टरांनी तिच्याच म्हणण्याला दुजोरा दिला.
“आणि खुनांना अडीच महिन्यापुर्वीच सुरूवात झाली आहे.” आगंतूक चटकन बोलून गेला आणि दोघेही त्याच्याकडे वळले. आगंतूक नकळत मागे सरला. ती डॉक्टरांकडे वळली.
“तुम्ही कोणी का असेना, हुशार आहात हे नक्की. पण मि. सरदेसाई नुसत्या विजिटींग कार्डाने तुम्ही डॉक्टर आहात हे सिद्ध होत नाही.” तिने त्यांच्या नजरेला नजर भिडवली.
“गुड पॉंईट. आफ्टर ऑल विजिटींग कार्ड इज नॉट ऍन आयकार्ड. पण आता या क्षणी हे महत्त्वाचं नाही की मी डॉक्टर आहे की नाही. आपण तुमच्या रिपोर्टच्या तर्काबद्दल बोलत होतो ना ? मग थोड्यावेळासाठी आपण असं समजून चालू की मी डॉक्टर आहे. उंचीने पावणेसहा फूट आहे. वय वर्षे एकोणचाळीस आहेत. सशक्त आहेच. तुम्ही आताच मला हुशार म्हणालात. मी डॉक्टर आहे असं म्हटल्याने ह्या प्रोफेशनशी रिलेटेड आहे. आता मी मानसतज्ञ आहे की मानसिक रुग्ण ते नंतर पाहू.” डॉ. पुन्हा तिला रिपोर्टकडे घेऊन आले.
“याने तुम्ही खुनी ठरत नाही. फक्त संशयित ठरताय.” ती गोंधळून म्हणाली.
“मी समजा म्हणतोय मिस. साटम. तुम्ही एकदम पुढची पायरी गाठू नका.” डॉक्टरांनी तिला विनंती केली.
“सॉरी. ” तिने चुक मान्य केली.
“आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा.”त्यांनी बोलता-बोलता बॅग उघडली.” माझ्याकडे हत्यारही आहे.”त्यांनी बॅगेतून स्टॅथोस्कोप काढला. दोघेही दचकले. बसल्या जागीच मागे सरले. पण डॉक्टरांचे त्याकडे लक्षचं नव्हते. “हे खुनी माणसाचे हत्यार. सगळे खून स्टॅथोस्कोपने गळा आवळून केले गेलेत. बरोबर ना ? ” तिची मान होकारार्थी हलली व आगंतूकाचीही.
“हे असे..” गळ्यात स्टॅथोस्कोप घालून दोघांना तो आवळून दाखवतात. दोघांच्या कपाळावर घाम दिसू लागतो.
“मला वाटतं तुम्हा दोघांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण तुमच्यापैकी कोणीही मानसतज्ञ नाही.” त्यांनी दोघांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
“तुम्ही माझी थट्टा करताय मि. सरदेसाई.” तिच्या  स्वरात राग डोकावला.
“थट्टा ? ही थट्टा वाटतेय तुम्हाला ? मी सिरियस आहे मिस. साटम. तुमच्या थिअरीप्रमाणे मी ही एक संशयित ठरतोय. ठरतोय ना ? खुनाचे हत्यार माझ्याकडे आहे. म्हणजे मी खुनी असू शकतो.” त्याच्या स्वरात तिला विचित्रपणा जाणवला.
“हे बघा तुम्ही……….” तिच्या रागावर तिला नियंत्रण ठेवता येत नव्हतं.
“खुनी दिसत नाही… की वाटत नाही. तसा मी डॉक्टरही वाटत नाही. मी खून करू शकणार नाही असं वाटतयं का ? सोप्प आहे ते. हा स्टॅथोस्कोप असा धरायचा…” स्टॅथोस्कोप धरून ते आगंतुकाच्या जवळ गेले. चपळाईने तो त्याच्या गळ्यात घालून आवळला. “असा गळयात घालून आवळायचा.” आगंतूकाने प्रतिकार सुरू केला. पण डॉक्टरांची पकड मजबूत होती. आगंतूक पुर्ण ताकदीनिशी, दोन्ही हातांनी स्टॅथोस्कोप काढण्याचा प्रयत्न करु लागला. ती विस्फारलेल्या नजरेने ते पहात होती. किंचाळी तिच्या ओठातच थिजलेली. डॉक्टरांनी तिच्याकडे वळून पाहीलं आणि दुसर्‍याच क्षणी आगंतुकाच्या गळ्याभोवतीचा स्टॅथोस्कोप त्यांनी काढला.
“पाहीलतं. सोप्प आहे ना ? ” ते बोलले. ती विस्फारलेल्या भयभीत नजरेने त्यांना पहात होती. आगंतुकाने फास निघताच गळा धरला व तो खोकू लागला. त्याच्या खोकण्याने डॉक्टर त्याच्याकडे वळले. “तुम्हाला लागलं का ? प्रॅक्टीकल दाखवण्याच्या नादात मी ….. सॉरी, तुम्हाला खरचं काही झालं नाही ना ? आय एम रियली सॉरी.” डॉक्टर पुन्हा पुन्हा दिलगिरी व्यक्त करताच घाबरून मागे सरलेल्या आगंतूकानी निव्वळ हातानेच ओ.के.चा इशारा केला व गळा कुरवाळू लागला. स्टॅथोस्कोप टिपॉयवर ठेवून डॉक्टर त्याच्याजवळ गेले.
“आर यु ओके ?”डॉक्टरांनी विचारणा केली.
“मी… ठिक… आहे.” आगंतुकाने पुन्हा हाताने इशारा करत ती शब्द कष्टाने उच्चारले.
“तुम्हाला वेड लागलय का डॉक्टर ? तुम्ही जीव घेतला होता त्या माणसाचा आता.” स्वतःला सावरून ती चक्क किंचाळलीच त्यांच्यावर. ते वरमले. आपल्या हातून चुक झाली हे त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.
“सॉरी. बॉथ ऑफ यु. तुम्हाला खरचं काही लागलं नाही ना ? ” ते पुन्हा आगंतुकाकडे वळले.
“अजून दोन मिनिटे आवळलं असतं तर नक्कीच झालं असतं.” आगंतुकाने स्पष्टपणे आपली भावना व्यक्त केली.
“पुन्हा सॉरी. इतके दिवस क्रिमिनोलोजीचा नुसता अभ्यास करतोय पण नुसतं वाचन. मेडीकल प्रोफेशनमध्ये प्रॅक्टीकल्सची इतकी सवय झालेली आहे की मी यातही प्रॅक्टीकल्सच्या विचारात होतो. एखाद्या प्रॅक्टीकल एक्स्पिरीअन्स फार मस्ट. ते कसं आणि कुठे करावं मी या विचारात होतो. तुमच्या थिअरीच्या निमित्ताने आत्ता इथे ते सुचलं आणि मी अमलात आणलं. मी असं करायला नको होतं, पण राहावलं नाही. सॉरी अगेन. माझ्या अशा वागण्याने तुम्हाला त्रास झाला. पण मला माझा मुद्दा जरा माझ्या पद्धतीने सिद्ध करायचा होता. बळी, आरोपी व साक्षीदार यांच्या अशावेळेस नेमक्या काय रिऍक्शनस असतात हे नुसतं अभ्यासुन वा धोकून चालत नाही. त्यासाठी जरातरी अनुभव हवाच.” डॉक्टरांनी त्याच्या वागण्याचे समर्थन केले.
“हा शुद्ध मुर्खपणा आहे. जीव जातो की नाही हे पहायला उद्या विषाची परिक्षाही घ्याल.” ती अजूनही संतापाने थरथरत होती.
“सांगता येत नाही. कधी कधी काही प्रयोग आधी स्वत:वरच करावे लागतात. प्रत्येक प्रयोगाला गिनीपिग उपलब्ध असतात असं नाही.” डॉक्टर तिच्या नजरेत नजर मिळवत म्हणाले. आपला मुद्दा पटवायला ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हा ठामपणा तेव्हा त्या डोळ्यात नक्कीच होता. क्षणभर थांबून त्यांनी रागाने थरथरणाया तिला पाहील आणि बळीच्या बकयासारखा चेहरा केलेल्या आगंतुकाकडे पाहीलं. मग पुन्हा ते तिच्याकडे वळले. क्षण दोन क्षण तिच्या रागावलेल्या चर्येला पाहून ते म्हणाले.
“मिस. साटम, इथे तुमच्यासमोर एक खून होत असताना तुम्ही ओरडला नाहीत की कुणाला मदतीला बोलावलं नाही? घाबरलेलात का ?” त्यांच्या स्वरातलं वेगळेपण जाणवलं तिला. गोंधळली ती त्या प्रश्नाने. ‘अरे, हो खरेच. किती विचित्र वागलो आपण. निदान किंचाळायला हवं होतं. चुकलचं.’ तिचा राग ओसरला. पण नकळत ती स्वतःवर चिडली. तिने दोघांकडे पाहील. डॉक्टर तिच्या उत्तराची वाट पहात होते आणि आगंतुकही.
“हो.” तिने शेवटी होकार दिला.
“क्राईम रिपोर्टरला असं घाबरून कसं चालेल ? ” त्याच्या स्वरात आता मघासचा मिश्किलपणा डोकावू लागला.
“नाही चालायचं. पण जे घडलं ते इतकं अनपेक्षित होतं की काही सुचलच नाही.” तिने सारवासारव करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही.
“घटना अनपेक्षितच असतात मिस. साटम. इथे जर खरोखरच खुनी असता तर तुमच्या डोळ्यादेखत एक बळी गेला असता. यु नीड टु बी स्ट्रॉंग मिस. साटम.” तिने होकारार्थी मान डोलावली पण तिची नजर आता दरवाज्याकडे होती. त्यांनी वळून पाहीलं. म्हातारा दाराजवळ उभा होता. बहुधा मघासच्या किंचाळण्याने आला असावा, त्यांनी अंदाज बांधला. क्षण दोन क्षण त्यांच्याकडे विचित्रपणे पाहून म्हातारा पुन्हा आत दिसेनासा झाला. 
“लेटस गो बॅक टू युवर रिपोर्ट. मला वाटते मिस साटम, जर मी डॉक्टर नाही तरीही हा स्टॅथोस्कोप माझ्याकडे आहे म्हणजे मी खुनी असू शकतो. राईट ?” ते तिच्याजवळ पोहोचले.
“राईट” थोडं मागे सरत ती म्हणाली.
“गुड. ज्याप्रमाणे हे विजिटींग कार्ड आणि स्टॅथोस्कोप हे सिद्ध करत नाहीत की मी डॉक्टर आहे तसेच खुन्याचे मला लागू पडणारे वर्णन आणि हा स्टॅथोस्कोप हे सिद्ध करू शकत नाहीत की मी एक खुनी आहे. ऍम आय राईट, मिस. साटम ?” त्यांनी तिच्या एकदम जवळ जाऊन विचारले.
“राईट.” ती मान हलवत म्हणाली.
“थॅंक्स. पण मिस. साटम, उद्या तुमचा हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर या वर्णनात बसणार्‍या प्रत्येकाला दुसरा माणूस संशयित म्हणून पाहीलं असं नाही वाटत तुम्हाला ? यामुळे बराच गोंधळ होऊ शकतो असं वाटत नाही तुम्हाला.” त्यांनी शक्यता बोलून दाखवली.
“शक्य आहे.” ती विचारात पडली.
“आणि हे वाचून खरा खुनी तुमच्यापत पोहोचला तर…  ” त्यांच्या या वाक्यावर ती दचकली. “मग काय ? तो कोणीही असू शकतो. मी……. हा……” त्यांनी आगंतुकाकडे बोट दाखवलं. तो गोंधळला. “कोणीही.” डॉक्टरांच्या चेहर्‍यावर पुन्हा स्मित होते. तिच्या कपाळावर घाम जमा झालेला. “चिंता करू नका. तुमच्या तर्काप्रमाणे तो जर खरोखरच हुशार असेल तर तो तुमच्यापर्यंत येणार नाही. मी असतो तर कधीच आलो नसतो. शिवाय तो फक्त आमच्यासारख्या सायकॅट्रिस्टचेच खुन करतोय……. ” बोलता -बोलता डॉक्टर थांबले. त्याबरोबर दोघांनी चमकून त्यांच्याकडे पाहील. तसे ते हळूच कुजबुजले. “म्हणजे….. म्हणजे उद्या माझाही खून होऊ शकतो. होऊ शकतो ना ? ” ते आळीपाळीने दोघांकडे वळले. दोघांच्या माना त्यांच्या नकळत होकारार्थी हलल्या.”आय हॅव टू टेक कॅअर ऑफ मायसेल्फ.”
“मि. सरदेसाई, तुम्ही नेमकं काय करताय ?” तिने आवंढा गिळत विचारलं.
“विश्लेषण. तुमच्या तर्कांचे. माझ्या पदधतीने. मला वाटतं तुमचे तर्क बरोबर आहेत. तुम्हाला काय वाटतं ? ” डॉक्टर आगंतुकाकडे वळ्ले.
“आता बरं वाटतयं” त्याचा हात अजून गळ्यावरच होता.
“आय ऍम रियली सॉरी.” डॉक्टरांनी पुन्हा दिलगिरी व्यक्त केली.
“मि. सरदेसाई, तुम्हाला असं वाटतयं की खुनी एक मानसतज्ञ आहे.” ती विचारांच्या वादळात हरवल्यासारखी बोलली.
” शक्यता आहे, पण कारण माहीत नाही. एखादी नवीन थिअरी मांडता येईल.” त्यांनी तिला आव्हान दिले.
“लेट मी ट्राय.” तिने आव्हान स्विकारलं.
“मी हे तुमच्यासाठी सिंपल करतो. मी एक मानसतज्ञ आहे आणि हे खुन मीच केलेत. ” ती त्यांच्याकडे रोखून पहाते. “असं समजा आणि सांगा.” ते मिश्किलपणे हसले.
“माझ्या एक-दोन प्रश्नांची तुम्ही उत्तरे दिली तर ते जमेल असं वाटतयं मला.” तिने तिची नजर त्यांच्यावर अजून रोखलेली होती.
“गो अहेड.” त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
“मानसतज्ञ म्हणून गेली किती वर्षे तुम्ही या क्षेत्रात आहात मि. सरदेसाई ?” पहिला प्रश्न.
“जवळ जवळ दहा वर्षे.”
“ज्या शहरात पुर्वी तुम्ही होता तिचे तुमचा चांगला जम बसला होता का ?” प्रश्न दुसरा.
“यस. अलबत.”
“मग ते शहर व जम बसलेला व्यवसाय सोडून इथे यायचं कारण ?” प्रश्न तिसरा.
“मिस. साटम. थिअरीसाठी एक-दोन प्रश्न ठिक आहेत. संपुर्ण उलटतपासणी घ्यायची गरज नाही.” डॉक्टर ठासून बोलले.
“मी उलटतपासणी घेत नाही. तुम्ही समजा म्हणालात ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तुमच्यावरून थिअरी मांडायची आहे म्हणजे  थोडीबहूत पार्श्वभुमी माहीत असणं गरजेचं आहे.” तिने तिचा मुद्दा स्पष्ट केला.
“हरकत नाही. पण आता आहे त्याच माहीतीच्या आधारे तुमची थिअरी मांडा.” ते तिच्या समोर येऊन बसले.
“ऍज यु विश. एक मानसतज्ञ म्हणून तुम्ही अनेक केसेस गेल्या दहा वर्षात हाताळल्या असणार. लोकांच्या मनावर इलाज करता-करता तुमचं स्वत:च मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण हे जाणवूनही तुम्ही स्वत:चे नीट निदान करू शकत नाही की स्वत:वर उपचार करू शकत नाही. इज इट पॉसिबल, मि. सरदेसाई ?” तिने मध्येच प्रश्न केला.
“शक्य आहे.”
“यामुळे तुमच्यात न्युनगंडाची भावना निर्माण होऊ शकते आणि तुम्ही वेळी अवेळी त्यामुळे ढासळू शकता. शेवटी नाईलाजास्तव तुम्हाला दुसर्‍या मानसतज्ञाकडे जावं लागते. पण तो तुम्हाला ओळखत असल्याकारणाने त्याचा तुमच्यावर विश्वास बसत नाही, तो तुमची खिल्ली उडवतो, जे त्यावेळी तुम्हाला जास्त फिल होते. त्यामुळे तुमच्या मनाला व पर्यायाने स्वत:ला, स्वत:च्या कह्यात ठेवता न आल्याने समोर पडलेल्या स्टॅथोस्कोपने तुम्ही त्याच्यावर हल्ला करता आणि त्याचा गळा आवळाता. मग हे चक्र पुढे ह्या ना त्या कारणाने चालू राहते.”
“हे असं होऊ शकतं ?” आगंतुक त्यांच्या या आगळ्यावेगळ्या खेळाने भांबावलेला.
“होऊ शकतं. मी हाताळल्यात अशा काही केसेस. कधी कधी निव्वळ न्युनगंडाची भावना साधारण माणसाला मनोरूग्ण बनवते. ही भावना जसजशी खोल रूजत जाते, तसतसा तो रूग्ण बाह्य जगाशी स्वत:चा संपर्क तोडून स्वत:चं असं त्याला हवं असलेलं विश्व बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या संकल्पनेत न बसणारी प्रत्येक व्यक्ती मग त्याची शत्रू होते. तुमच्या या थिअरीला मी मान्यता देतो. अजून काही ?” सरदेसाई पुन्हा तिच्याकडे वळले.
“आता अस गृहीत धरू की तुम्ही मानसतज्ञ आहात. पण मुळात तुम्हाला या प्रोफेशनची आवड नाही. दुसर्‍याच्या इच्छेने……. म्हणजे….. वडीलांच्या…. जे नॉर्मली होते… वडीलांच्या इच्छेने तुम्ही हे प्रोफेशन स्विकारलेलं आहे. आवड नसल्याने यात तुमचा जम बसत नाही.” तिने नवीन थिअरी मांडायला सुरूवात केली.
“खराय…” सरदेसाई नकळत स्वत:शीच पुटपुटले.
“आपल्या आंतरिक इच्छा डावलून नको असलेलं ओझं घेऊन आपण फिरतोय हे डाचत राहतं. त्यातच अपयशाची भर दु:खाला डागण्या देत राहते. त्यामूळे या व्यवसायातील यशस्वी सहकारी वा संबधित व्यक्तींबद्दल नकळत एक राग मनात धगधगू लागतो. ज्वालामुखीसारखा. ज्यावेळेस तो उफाळून वर येतो तेव्हा कोणा ना कोणाचा बळी जातो.” तिने त्यांच्या नजरेत नजर भिडवली.
“एक मिनिट…” सरदेसाई तिला थांबवतात.
“काय झालं ? ही थिअरी तुम्हाला लागू होतेय का मि. सरदेसाई ?” तिने नजर न हटवता विचारलं.
“डॉन्ट जम्प टू कन्क्लुजन, मिस. साटम. तुमची थिअरी वर्केबल आहे. माझं म्हणालं तर माझे वडील एक मानसतज्ञ होते व मी या प्रोफेशनमध्ये यावं ही त्यांचीच इच्छा. त्यांच्या शेवटच्या इच्छेला प्रमाण मानून मी हा मार्ग स्विकारला. आपण दुसर्‍याने सांगितलेलं आयुष्य जगतोय असं वाटायचं सुरूवातीला. पण नंतर मात्र मला यात गोडी निर्माण झाली.” सरदेसाई तिच्या शंकेचे समाधान करण्याचा आपल्या परिने प्रयत्न केला.
“जर तुम्हाला गोडी निर्माण झाली नसती तर…..” तिने पुढचे फाटे फ़ोडले.
“जर तरचे सवाल निरर्थक असतात मिस. साटम. पण तुमच्या या थिअरीसोबत एक थिअरी मी सुचवू का ?” सरदेसाईने नवाच पेच टाकला.
“बोला.” ती सरसावून बसली. त्या दोघाच्या या खेळात आता आगंतूक रमू लागलेला.
“माझ्यासारखा एक नामवंत मानसतज्ञ एका शहरात दहा वर्षे प्रॅक्टीस करतोय. पैसा आणि प्रतिष्ठा पायावर लोळण घेतेय. आणि अचानक काही कारणास्तव मला ते शहर सोडून नव्या शहरात जावं लागतं. जिथे मला कोणीच ओळखत नाही. प्रसिद्धीच्या शिखरावरील मी क्षणार्धात गर्दीचा भाग होतो. इथे आधीच अनेक प्रतिस्पर्धी जम बसवून आहेत. त्यात माझं बस्तान बसवण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे प्रस्थापितांना मुळासकट उपटायचं व या व्यवसायाची जाहीरात करायची. यासाठी सरळ सोपा मार्ग म्हणजे मनोरुग्णाच्या अर्विभावात इथल्या मानसतज्ञांना संपवणे.”
“तुमची ही थिअरी.. थिअरी नसून…”तिने मध्येच त्यांना अडवलं.
“आत्मकथा वाटतेय.” त्यांनी तिचं वाक्य पुर्ण केलं. तिने मान डोलावली. आगंतुकानेही. “वेल, ही थिअरीच आहे, मिस. साटम.”
“तुमची थिअरी माझ्या थिअरींपेक्षा जास्त परिणामकारक वाटतेय मि. सरदेसाई. कदाचित…” ती विचारमग्न होऊन बोलत असतानाच त्यांनी तिचं वाक्य कापलं.
“तो मी नव्हेच.” त्यांनी दोन्ही हात वर केले.
“कदाचित तो खूनी एखादा मानसतज्ञ असावा.” त्यांच्याकडे लक्ष न देता तिने वाक्य पुर्ण केले.
“पण खूनी ’तो’ आहे असं गॄहीत का धरताय ? ’ती’ ही असू शकेल ?” त्यांनी आपला सुरूवातीचा मुद्दा पुन्हा मांडला.
“ती कशावरून ?” तिला ते पटलं नाही हे जाणवलं त्यांना.
“खून आतापर्यंत फक्त पुरूषांचेच झालेत. म्हणून खुनी एखादी स्त्री असण्याची शक्यता नाकारता येत नाही.” त्यांनी स्वत:च्या भात्यातला तर्क काढला.
“हा तर्क पोकळ आहे मि. सरदेसाई.” ती ठासून बोलली.
“मलाही असचं वाटतयं.” आगंतुकाने त्यांच्या संभाषणात भाग घेतला.
“नो वे. पुरुषद्वेषाने हत्या करणाऱ्या स्त्रियांची अनेक उदाहरणे आहेत मिस. साटम. ती एखादी डॉक्टर, नर्स, पेशंट किंवा…” ते क्षणभर थांबले.
“किंवा ?” तिने प्रतिप्रश्न केला.
“एखाद्या मानसतज्ञाची बायको.”ते शांतपणे बोलले.
“वॉट नॉनसेन्स ?” ती उठून उभी राहीली. “काहीही बरळताय तुम्ही.”
“नथिंग नॉनसेन्स मिस. साटम. याच शहरात चार वर्षापुर्वी स्टॅथोस्कोपने एका प्रख्यात मानसतज्ञाचा त्याच्याच वेड्या बायकोने गळा आवळून खून केला होता.” डॉक्टरांनी पुरावे द्यायला सुरूवात केली.
“अस कधी घडलेलं नाही.” तिच्या वरच्या पट्टीतल्या स्वरात ठामपणा मात्र नव्हता.
“घडलय. याच शहरात. ती बाई वेडी होती. मनोरुग्ण होती. ती….” डॉक्टरांच्या बोलण्यात खात्री होती.
“ती वेडी नव्हती.” तिचा स्वर किंचीत कापरा झाला.
“होती. शंभर टक्के होती. स्वत:च्या नवर्‍याचा खून करणारी ती बाई वेडीच होती.” डॉक्टर आता फारच ठामपणे बोलले.
“स्टॉप इट. ती वेडी नव्हती. ती वेडी नव्हती.”ती जवळ-जवळ त्यांच्या अंगावर धावून गेली.
“रिलॅक्स. तुम्ही एवढं पर्सनली का घेताय ?  मी वर्तमानपत्रात जे वाचलं तेच सांगितलं. ती वेडीच होती म्हणून तर….” स्वत:ला सावरत डॉक्टर बोलले.
“ती वेडी नव्हती.” ती ओरडली. एक हुंदका मागोमाग आला. तिचा स्वर रडवेला झाला.” माझी मम्मा वेडी नव्हती,” ती हुंदके देत सोफ्यावर कोसळली. ते एकताच तिथे शांतता पसरली. बाहेर पावसाचा जोर बराच वाढला होता. खिडकीच्या तावदानावर थेंबाचा मारा होत होता. दुर कुठेतरी वीज कडाडली. आता फक्त पावसाचाच आवाज होता.
“सॉरी.”भावनांचा आवेग ओसरून गेला तशी ती भानावर आली. डॉक्टरांनी उठून तिची बॅग उघडली व आतला नॅपकीन काढून तिच्यासमोर धरला. त्यांनी बॅग उघडली हे पाहताच तिने पटकन पुढे सरून बॅग बंद करण्याचा प्रयत्न केला व त्याच वेळेस बॅगेतल्या वस्तूवर डॉक्टरांनी ओझरती नजर टाकलीच . तिने शक्य तेवढ्या चपळाईने बॅग बंद केली. नॅपकीनने तोंड व डोळे पुसून तिने नॅपकीन जवळच ठेवला. डॉ. पुन्हा आपल्या जागेवर बसले.
“यु आर ओके मिस. साटम.” क्षणभराने डॉक्टरांनी तिची विचारपुस केली.
” यस.” तिने त्यांच्याकडे पाहील. थोडा वेळ कोणीच काहीच बोललं नाही. मग त्या शांततेचा डॉक्टरांनी भंग केला.
“मला कल्पना नव्हती की…..”
“रणजित साटम माझा बाप होता.” तिने त्यांचा रोख ओळखून बोलायला सुरूवात केली.” पण बाप म्हणवण्याच्या लायकीचा तो माणूस नव्हता. जगाच्या मनाची उकल करण्याचा दावा करणारा माणूस आपल्या बायकोचं मन कधीच ओळखू शकला नाही. मी तेव्हा हॉस्टेलवर असायचे. ममा नेहमी तिच्या पत्रात त्यांच गुणगान करायची. पण त्यांचा बाहेरख्यालीपणा तिच्या आंधळ्या प्रेमाला कधी दिसलाच नाही. व्हिजीटस आणि सेमिनारच्या नावे चालणारा धुडगूस तिला कळला, तेव्हा ते सहन करायच्या पलिकडचं होतं. मग रोज भांडण. आपल्या प्रेमाचा पराभव तिला सहन झाला नाही. त्याचाच फायदा उचलून त्यांनी तिला मनोरुग्ण म्हणून जगजाहीर केलं. मला तिच्या पत्रातून सारं कळत होतं. त्या रात्री मात्र त्यांनी कहरच केला. ते एका बाईला घेऊन घरी आले. काय वाटलं असेल माझ्या ममाला तेव्हा ? नशेत बेगुमान झालेल्या माणसाला तिने अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या माणसाने एका बाजारबसवीसाठी आपल्या लग्नाच्या बायकोवर हात उचलला. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि तिने समोरच पडलेला स्टॅथोस्कोप उचलला आणि त्यांच्या गळ्यात घातला. ती बाई पळाली. त्यांनी तिला शिव्या हासडायला सुरूवात केली व प्रत्येक शिवीगणिक तिच्या नकळत त्यांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला गेला. झाला प्रकार तिच्या लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता आणि मग…”
बोलता-बोलता ती पुन्हा हुंदके देऊ लागली.
“रिलॅक्स मिस. साटम. रिलॅक्स. शांत व्हा.” डॉक्टरांनी सांत्वनाचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा वातावरणात शांतता पसरली. तिने नॅपकीनने डोळे पुसले. नॅपकीन बॅगेत ठेवून बॅग स्वत:शेजारीच ठेवली.  थोड्या वेळाने ती शांत झाली आहे हे लक्षात येताच डॉक्टर पुढे बोलू लागले.
“त्यानंतर त्यांनीही आत्महत्या केली. पण त्या रात्री तिथे काय झालं ते कोणालाच माहीत नाही, मग तुम्ही एवढ्या खात्रीने कसं सांगू शकता ?”
“आत्महत्या करण्यापुर्वी तिने सगळ्या गोष्टी एका पत्रात लिहील्या होत्या व ते पत्र माझ्या स्टडीटेबलमध्ये तिने ठेवलं होतं. साधारण सहा महिन्यांनी मला ते सापडलं.” तिने त्यांच्या शंकेच निरसन केलं.
“मिस. साटम रागवणार नसाल तर एक सांगतो.” तिने मुक संमती दिली. डॉक्टरांनी संभाषण चालू ठेवले.”तुम्ही हॉस्टेलवर होता. तुमच्या घरातल्या गोष्टी कळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या आईंची पत्रे. त्यामुळे तुम्ही जेवढं तुमच्या आईवर प्रेम करत होता, तेवढाच.. किंबहूना त्याहीपेक्षा जास्त तुम्ही तुमच्या वडीलांचा तिरस्कार करत होता. तुमच्या घरी जे घडलं, त्या सगळ्या घटनेला तुम्ही तुमच्या वडीलांना जबाबदार मानता.”
“सत्य तेच आहे.” दुसरं कोणतही सत्य ती स्विकारणार नाही हे तिच्या आवाजावरून त्यांना जाणवलं.
“असेल. मग त्या पुढचा उत्तरार्ध काय ?” डॉक्टरांचा प्रश्न तिला गोंधळवून गेला.
“म्हणजे?” तिने चमकून विचारलं.
“म्हणजे वडिलांच्या बद्दल वाटणार हा तिरस्कार इतका वाढत गेला की शेवटी प्रत्येक मानसतज्ञात तुम्हाला तुमचे वडील दिसू लागले.” डॉक्टरांनी वेगळीच थिअरी मांडली.
“मि. सरदेसाई, तुम्ही भलत्याच कल्पना करताय. तेव्हा आता हा थिअरीजचा खेळ थांबवुया. इनफ नाऊ.” ती किंचित चिडून बोलली. पण डॉक्टर आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते,
“आईवर झालेल्या अत्याचाराचा सुड घ्यायचाच, हे प्रकर्षाने तुमच्या मनात घोंगावत राहीलं. प्रतिशोधाच्या या वणव्यात तुम्हाला फक्त तुमच्या आईचाच मार्ग योग्य वाटू लागला आणि म्हणून तुम्ही…” बोलता-बोलता डॉक्टरांनी तिच्या बॅगेवर झडप घालून त्यातला स्टॅथोस्कोप काढला.” तोच स्टॅथोस्कोप घेऊन नव्या सावजाच्या मागे लागलात.”
“आय सेड स्टॉप इट.” ती किंचाळली.
“हेही सत्य आहे मिस. साटम. पुढील सत्य.” डॉक्टर स्टॅथोस्कोप तिच्यासमोर हलवत म्हणाले. अचानक डॉक्टरांनी तिच्यावर केलेल्या या आरोपामुळे आगंतुकही गोंधळला. नकळत तिच्याबद्दल त्याच्या मनात संशय दाटू लागला जो काही क्षणापुर्वी डॉक्टरांसाठी होता. पण त्या दोघांच्या कात्रीत सापडल्यासारखा तो दोघांपासून समांतर अंतर राखून बसला. कोणत्याही क्षणी पळ काढता येण्याच्या पवित्र्यात. त्याचवेळेस म्हातारा धावतच तिथे आला. तिची मघासची किंचाळी त्याने ऐकली होती. डॉक्टरांच्या हातातला स्टॅथोस्कोप पाहून मात्र तो दाराजवळच उभा राहीला. डॉक्टर तिच्या चिडलेल्या चर्येकडे पहात होते. ती त्यांच्या हातातल्या स्टॅथोस्कोपकडे. काही क्षणातच तिच्या चेहर्‍यावरची चीड नाहीशी झाली आणि ती खळाळून हसली. तिच्या हसण्याने ते तिघेही गोंधळले. पण तिचं हसणं थांबवण्याचा मात्र कुणीच प्रयत्न केला नाही. तिघेही आता ती काय स्पष्टीकरण देते हे ऐकण्यासाठी कान लावून उभे. बसल्या जागेवरून तिने हसता-हसता तिघांकडे पाहीलं.
“गुड वन डॉक्टर. माझाच खेळ माझ्यावर उलटवताय. ” ती म्हणाली.
“हा आता खेळ नाही मिस. साटम.” डॉक्टरांचा स्वर गंभीर होता.
“आहे डॉक्टर. मघाशी माझ्या नजरेत तुम्ही संशयित होता, आता तुमच्या जागी मी आहे. फरक इतकाच. आता राज्य माझ्यावर.” ती उठून उभी राहीली. तिने त्यांच्या हातातला स्टॅथोस्कोप घेतला. त्यांच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली,
“यस, आय हेट माय फादर. त्या माणसाने माझ्या ममाला मारलं. तो जिवंत असता तर मीच एव्हाना त्याचा खुन केला असता. पण  ते काम माझ्या ममाने केलं. अशा माणसाला तिने धडा शिकवला या गोष्टीचा मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल असलेला तिरस्कार मी जिवंत असेपर्यंत माझ्या मनात जिवंत राहील.”
“म्हणून…. ?” डॉक्टर अजून तिच्या कन्फेशनची वाट बघत होते.
“म्हणून…… म्हणून काहीच नाही डॉक्टर. राग फक्त एका व्यक्तीबद्दल आहे, तुम्हा समस्त मानसतज्ञांवर नाही. मी इतकी कमकुवत नाही की त्यामुळे सिरियल किलर बनून सगळ्यांचे खून करत राहीन.” तिने त्यांच्या थिअरीच्या ठिकर्‍या उडवल्या.
“मग एका रिपोर्टरच्या बॅगेत स्टॅथोस्कोप कशाला ?” डॉक्टरांचा संशय ठिय्या मांडून होता.
“फक्त माझ्या बॅगत स्टॅथोस्कोप आहे म्हणून मी खुनी आहे असं म्हणायचय का तुम्हाला ?” तिने त्यांना खिजवण्याच्या सुरात विचारलं.
“प्राप्त परिस्थितीत दुसरं काही दिसत नाही मिस. साटम.” डॉक्टर अजून साशंकच.
“डॉक्टर तुम्ही मांडलेली थिअरी चांगली आहे. पण निव्वळ अशा परिस्थितीजन्य पुराव्यामुळे मी खुनी सिद्ध होत नाही. हा तुमच्या भाषेत म्हणायचं तर फक्त एक संशयित ठरतेय तुमच्याप्रमाणे. ऍम आय राईट डॉक्टर.” यावेळेस डॉक्टरांनी मान डोलावली व आगंतुकानेही.
” बाय दे वे, डॉक्टर हा स्टॅथोस्कोप माझ्या एका डॉक्टरमित्राचा आहे. हवं तर तुम्ही त्याच्याशी आता बोलू शकता. या विषयावर कवर स्टोरी बनवायची म्हटल्यावर मला हत्याराची संपुर्ण माहीती द्यायलाच हवी. शिवाय हत्यार हाताळल्याशिवाय त्यातले बारकावे कसे कळतील? मला अंदाजे रिपोर्ट लिहायचा नाही डॉक्टर.” तिने तिची बाजू मांडली. म्हातारा ते ऐकल्यावर आत निघून गेला.
“तुमचा रिपोर्ट आल्यावर काय होईल ते होईल, पण आता या क्षणी निव्वळ त्याच्यावरील चर्चेने आपण दोघे सशयित ठरलो.” डॉक्टर पुन्हा मिश्किल झाले.
“नक्कीच. पण या तुमच्या गप्पांच्या आयडीयामुळे काही नव्या थिअरीज कळल्या. रिपोर्ट बनवताना याचा फार उपयोग होईल मला.” तिने त्यांना हसून अनुमोदन दिले.
“मी काही बोलू शकतो का ?” बर्‍याच वेळाने आगंतुकाने तोंड उघडले. ती त्याच्याकडे वळली.
“बोला.” डॉक्टरांनी त्याला अनुमती दिली.
“मी हे जे पुस्तक वाचतोय ते अशाच सिरियल किलरबद्दल आहे. यातला कथानायक एक सरळमार्गी माणूस असून त्यांची बायको मानसिक रुग्ण होते. तो तिला घेऊन एका मानसतज्ञाकडे जातो. पण तो मानसतज्ञ त्याच्या बायकोचा गैरफायदा घेतो, ज्यामुळे त्याची बायको त्याच क्लिनिकमधून उडी मारून आत्महत्या करते. कथानायक बायकोचं रक्तबंबाळ शव पाहून सैरभैर होतो. तो डॉक्टरला जाब विचारतो तेव्हा डॉक्टर त्याच्या बायकोला चरित्रहीन असल्याचा आरोप करतो. म्हणून तो त्याचा खून करतो. मग एकामागोमाग एक.” त्याने कथा संक्षिप्तपणे सांगितली.
“ही एखाद्या सत्यकथेसारखी वाटते.” ती बोलली आणि पुन्हा सोफ्यात विसावली.
“सगळ्याच कथा कल्पित नसतात मिस.साटम. प्रत्येक कथेत कुठे ना कुठे सत्याचा अंश असतोच.” डॉक्टर तिच्यासमोर स्थानापन्न होत म्हणाले.
“तुम्हाला तो तरूण गुन्हेगार वाटतो  का?” आगंतुकाने दोघांना विचारलं.
“माणूसकीच्या दृष्टीकोनातून म्हणाल तर ’यस’ आणि डॉक्टर म्हणून म्हणाल तर मला तो एक पेशंट वाटतो ज्याला उपचारांची गरज आहे.” डॉक्टरांनी त्याला उत्तर दिले.
“पण जर तो एखाद्या डॉक्टरकडे गेला व त्याने त्याचा जर प्रोब्लेम डॉक्टरला सांगितला तर ते सरळ पोलिसांनाच बोलावतील. मग आणखी एक खुन.”त्याने पुढचा परिणाम सांगितला.
“ही इज राईट.” ती म्हणाली.
“मान्य.” डॉक्टरांनी होकार दिला.
“मला या कादंबरीचा अनुवाद करायचाय. त्यासाठी मला तुमची मदत मिळेल का डॉक्टर ?” त्याने डॉक्टरांना विनंती केली.
“माझी काय मदत होऊ शकते ?” डॉक्टरांनी त्याच्या विनंतीत रस दाखवला.
“तुम्ही स्वत: एक सायकॅट्रिस्ट आहात. काही बारकावे तुम्हीच नीट सांगू शकाल. मला तुमचं कार्ड मिळेल का ?” त्याने पुन्हा विनंती केली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. आगंतुकाने त्याची बॅग उघडली. म्हातारा बाहेर आला. डॉक्टरांनी खिशातुन कार्ड काढले व आगंतुकाला द्यायला पुढे सरले.
“हे घ्या.”म्हणत त्यांनी कार्ड पुढे केले. आपल्या उघड्या बॅगेला बंद करण्यापुर्वीच आगंतुक डॉक्टरांकडे वळला. त्याने कार्ड घेतलं.  डॉक्टरांची नजर बॅगेवर खिळली.
“जरा एक मिनिट मला ते पुस्तक दाखवता का ?” असं म्हणत डॉक्टर पुढे सरले. म्हातार्‍याने दरवाजा उघडला. डॉक्टरांनी बॅगेत हात घातला आणि आगंतुक काही करण्याआधीच बॅगेतून स्टॅथोस्कोप बाहेर काढला. दारात उभी व्यक्ती इन्स्पेक्टर होती.
“तू ?” डॉक्टर न राहवून ओरडलेच. त्याबरोबर इन्स्पेक्टरचे लक्ष त्यांच्याकडे गेले. इन्स्पेक्टर त्याच्या दिशेला धावले.
“कोणाचा आहे हा स्टॅथोस्कोप ? ” इन्स्पेक्टरांनी दरडावणीच्या सुरात विचारलं
“याचा.” डॉक्टर चटकन बोलले.
“यांच्याकडेही आहे.” आगंतुकाने तेवढ्याच वेगाने इन्स्पेक्टरला माहीती पुरवली.
“हिच्याकडेही आहे साहेब.” म्हातार्‍याने तिच्याकडे बोट दाखवले.
“तिघांकडे ? सरप्रायजिंग. “इन्स्पेक्टरांनी डॉक्टरांच्या हातातला स्टॅथोस्कोप काढून घेतला.
“साहेब, वेळेवर आलात. मी मघापासून या तिघांचं बोलण ऐकतोय. ह्या माणसाने तर याच्या गळ्यात स्टॅथोस्कोप घालून त्याचा गळा पण आवळला. ह्या बाईच्या आईने आपल्या नवर्‍याचा खुन या स्टॅथोस्कोपनेच केला होता. मला वाटतं या तिघांपैकी कोणी तरी एकजण खूनी आहे.” म्हातार्‍याने घडल्या प्रकारातील महत्त्वाचे तेवढे इन्स्पेक्टरला सांगितले.
“तुम्ही कोण ?” इन्स्पेक्टर म्हातार्‍याकडे वळले.
“मी इथला नोकर आहे साहेब.” म्हातार्‍याने ओळख दिली.
“नाव काय ?”
“म्हादेव. म्हादेव बेंद्रे, साहेब.”
“मघाशी फोन तुच उचलला होतास तर.”
“फोन ?”
“आंग्रे. इन्स्पेक्टर आंग्रे.”
“पण साहेब अजून आले नाय.”
“हरकत नाही.” इन्स्पेक्टर तिघांकडे वळले. “तुम्ही तिघांनी इतके टेन्स व्हायचे काही कारण नाही. तुमच्यापैकी कुणी खुनी नाही. कारण आम्ही खुनी मघाशीच पकडला.” त्यांनी स्टॅथोस्कोप आगंतुकाला दिला.
“कोण आहे कोण तो ?” तिघांनी एकदम विचारलं.
“डॉ. रेगे.”
“काय ?” बाहेर कडकडणारी वीज अंगावर कोसळल्यासारखं झालं चौघांना.
“पण त्यांनी हे सगळे खुन का केले ?” डॉक्टरांनी विचारलं.
“आताच तर थोड्या वेळापुर्वी अटक केली त्यांना. अजून संपुर्ण माहीती मिळाली नाही. पुढील तपासासाठीच आलोय येथे. म्हणून तर मघाशी फोन करून पाहीलं, कोणी आहे की नाही घरात ते.”  इन्स्पेक्टरांनी कारण सांगण्यास असमर्थता दर्शवली. मग त्यांनी खिशात सेल काढून कॉल केला.
“हॅलो, आंग्रे बोलतोय. वॉरंट मिळालं का ? ठिक आहे. या लवकर मी वाट पहातोय.” त्यानी सेल पुन्हा खिशात सारला आणि ते तिघांकडे वळले.
“पण तुम्ही सगळे इथे का जमलात ?”
“मी डॉक्टर. निशिकांत देसाई. डॉ. रेगेंना भेटायला आलो होतो. त्यांच्या प्रबंधावर चर्चा करायला.” डॉक्टरांनी उत्तर दिले.
“आपण ?” आंग्रे तिच्याकडे वळले.
“मी सुहास साटम. ’शोध’ या पाक्षिकाची रिपोर्टर. डॉक्टर रेगेंची मुलाखत घ्यायला आले होते.” ती उत्तरली.
“मी सदानंद वाणी. इक्विपमेंट सप्लायर आहे साहेब. हे माझं कार्ड.”

समाप्त.

Hello world!

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!