कौतुक शिरोडकर | 29 September, 2008 – 14:10

असं होतं का तुमच्या बाबतीत ?

म्हंजे कसं माहीताय…सकाळी उठल्यावर स्वतःची तयारी, मुलाची तयारी, किचनमधून येणारे विनंतीवजा हुकूम, मध्येच वाजणारा मोबाईल, टाकीत पाणी चढवण्याचा कार्यक्रम, लोडशेडींगची अवचित येणारी हाक, मुलाला शाळेत पोहोचवणे वगैरे ..वगैरे यातून रस्त्यावरील नाना अडचणींना तोंड देत, पार्कींगमध्ये गाडी ढकलून वेळेवर आलेली गाडी गाठायची. दम लागला…

डब्यात पोहोचल्यावर जाणवतं, आपण नेहमीप्रमाणे पोहोचलो असून मोक्याच्या सगळ्या जागा कुणी ना कुणी आधीच काबिज केलेल्या आहेत. काही ओळखीचे चेहरे दिसले की जरा हायसं वाटतं. मग पॅसेजच्या मध्ये एखादा किंवा दोन्ही हात शरण आल्याप्रमाणे वर हवेत धरायचे व अंदाजे जे हाती येईल ते धरायचे. आधारासाठी…..हे स्वतःच्या समाधानासाठी…आपल्याला उगाच वाटत राहतं की आपणास कशाचा तरी आधार आहे…

गाडी स्टेशन सोडते व थोड्याच वेळात प्रत्येक स्टेशननंतर आपण एका तुडूंब भरलेल्या डब्यातले एक असतो. दोन हात वर्…शरीर आठही बाजुने एखाद्या रवीसारखे घुसळत असते. आपण गुदमरत असतो…गर्दी वाढत असते…इतर कोणत्याही वैयक्तिक बाबीसाठी जागा नसते. नुस्ती वाट पहात राहायची.

मग कुठेतरी एक लोंढा येतो व आपल्याला बाहेर फेकतो. आपल्याला तिथे उतरायचं नसते. मग पुन्हा त्याच गाडीसाठी आटापिटा.

कधी कधी दगडाला घट्ट चिटकलेल्या शेवाळासारखे आपण आत तगतो. मग थोडी गर्दी कमी होते. क्वचितप्रसंगी एखादी जागा बसायला मिळते. कधी चुकून खिडकी. मग एकेक सहप्रवासी कमी होऊ लागतात. शेवटी आपल्या स्थानाला आपण उतरतो.

हे सगळं होत असेल तुमच्याबाबतीत. पण कधी कधी असं माझ्या मनाच्या बाबतीत होतं. असेच ते कशाला तरी शरण जातं..कधी उगाच हेलकावे खाते.. कधी सयींच्या गदारोळात हरवतं तर कधी असंख्य सयीच्या वर्षावात गुदमरत. मग अचानक बांध फुटावा तसा मन हलकं होऊ लागतं. कधी शांत तर कधी नव्या आठवांची लडी उलगडत पुढे जाते. मनाची आवर्तने क्षणाक्षणाला बदलत राहतात. एखादी गुदगुदल्या करणारी आठवण बहरवून जाते तर एखादी हळवं करून जाते. मग वावटळ येऊन गेल्यावर आभाळात उडालेली धूळ पुन्हा धरतीवर यावी तसं मन पुन्हा सगळ्या आठवणी कवटाळून, त्यांना फडताळात त्यांच्या जाग्यावर ठेवून गपगार होते.

हे आयुष्याच्या बाबतीत होऊ शकते ना ?? तुम्हाला काय वाटते ? आयुष्याच्या प्रवासात कधी आपण अवचित एखाद्या स्टेशनवर उतरतो. जगण्याची इच्छा असताना. मरण थोपवता येत नाही म्हणून. आयुष्याची दोरी जर बळकट असली तर पुन्हा अपघातातून सावरून नव्याने प्रवास सूरू. कळत नकळत सहप्रवासी निघून जातात. आपण त्याच्या जागेवर.

असं काहीतरी मला वाटत राहते.

तुमच्याबाबतीत होत का असं कधी ??????????